पाणीटंचाईच्या झळा ! हंडे भरून डोंगरदर्‍यात पायपीट

पाणीटंचाईच्या झळा ! हंडे भरून डोंगरदर्‍यात पायपीट
Published on
Updated on

पौड : पुढारी वृत्तसेवा : मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या आत असलेल्या वेगरे येथील वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरण, झरे येथून हंडे भरून वर डोंगरावर नागरिकांना पाणी न्यावे लागत आहे. पावसाळ्यात ओला तर उन्हाळ्यात कोरडा दुष्काळ येथील नागरिकांना अनुभवायला मिळत असून, 'धरण उशाला व कोरड घशाला' अशी स्थिती येथे निर्माण झाली आहे.

वेगरे धनवी परिसरात गेले अनेक वर्षांपासून उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. या वर्षी तर आतापासूनच पाण्याची टंचाई जाणवत असून येथील ग्रामस्थांना पिण्याच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून डोंगरातून तीव्र उतारावरून पाणी डोक्यावर आणावे लागत आहे. त्यामुळे अनेक वेळा पाय घसरून अपघात होण्याची देखील शक्यता आहे. तेथील पाणीप्रश्न कायमचा सुटावा म्हणून ग्रामस्थ अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी सोलरवर आधारित केलेली जलजीवन
योजना काही अज्ञातांनी जाळली तेव्हापासून ती बंद आहे.

केंद्र सरकारची जलजीवन मिशनची हर घर जल योजनाही अपूर्ण अवस्थेत आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कामाची मुदत संपूनदेखील पूर्ण झालेले नाही. पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांच्या चुकीच्या सर्व्हे व अंदाजपत्रकामुळे येथील पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. वेगरे, धनवीसह मुळशीतील सर्व टंचाईग्रस्त वाडी-वस्त्यांचा सर्व्हे करून तत्काळ उपाययोजना व्हायला हवी. जलजीवनची हर घर नळ ही योजना प्रत्यक्षात सर्वत्र पोहचणार की कागदावर राहणार ? आमच्या डोक्यावरचा हंडा खाली कधी येणार ? असे प्रश्न येथील ग्रामस्थ विचारत आहेत.

धरण उशाला आणि कोरड घशाला

खरंतर पावसाळ्यात या परिसरात जोरदार पाऊस पडतो. त्यामुळे पुणे शहराच्या पिण्याचे पाण्यासाठी वेगरे गाव व परिसरात टेमघर धरण बांधले. हे धरण गावात असूनही ग्रामस्थांना फक्त पाणी दिसते; मात्र उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी डोंगर उतारावरून पायपीट करावी लागते. त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी येथील अनेक वाड्या-वस्त्यांवरील आदिवासी, धनगर, कातकरी बांधवांची अवस्था झाली आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news