पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. साप्ताहिक सुटीनिमित्त रविवारी (दि.19) प्रचार करण्यास उमेदवारांसह त्यांचे समर्थक व कार्यकर्ते सकाळपासून व्यस्त होते. दुपारच्या कडक उन्हातही पदयात्रा, गाठीभेटीसह स्पीकर लावलेल्या रिक्षा सर्वत्र फिरत होत्या. शिवजयंतीनिमित्त विविध मंडळे, कॉलनी व हाउसिंग सोसायट्यांना भेटी देण्यावर उभेदवारांनी भर दिला. प्रचारासाठी केवळ पाच दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जोश वाढला आहे.
निवडणुकीसाठी येत्या रविवारी (दि.26) मतदान होणार आहे. प्रचार येत्या शुक्रवारी (दि. 24) सायंकाळी बंद होणार आहे. प्रचारातील साप्ताहिक सुटीचा हा रविवार शेवटचा असल्याने जास्तीत जास्त मतदारांचा संपर्क साधण्यासाठी तसेच, गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांसाठी कार्यकर्त्यांनी भर दिला. शिवजयंतीचा मुहूर्त साधत उमेदवारांनी मंडळ, संस्था, संघटना, कॉलनी, हाउसिंग सोसायट्यांना भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. पक्ष व चिन्हाच्या झेंडासह कार्यकर्त्यांच्या वाहनांवर भगवे ध्वजही लावण्यात आले होते. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यावर भगवे ध्वज लावलेली वाहने फिरताना दृष्टीस पडत होते.
सुटीमुळे झालेली गर्दी लक्षात घेऊन बाजारपेठा, भाजी मंडई आणि आठवडे बाजारात स्पीकरवर घोषणा करणार्या रिक्षा फिरताना दिसत होत्या. तसेच, एलईडी स्क्रीन लावलेली वाहने चौकाचौकांत उभी करून उमेदवारांची माहिती नागरिकांना दिली जात होती. उमेदवारांनी शिवजयंतीनिमित्त मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांच्या भेटगाठी घेत संवाद साधला. सुटीमुळे कुटुंबातील सर्वच सदस्य घरी असल्याने लोकवस्ती व हाउसिंग सोसायटीच्या परिसरातून वारंवार रिक्षांवरील स्पीकरवरून मतदानासाठी आवाहन केले जात होते. त्यामुळे एक रिक्षा गेली की दुसरी रिक्षा येत प्रचार करीत असल्याचे चित्र अनेक भागात दिसून आले. तसेच, सुटीमुळे अनेक ठिकाणी बैठका घेऊन चर्चा करीत आश्वासनांची खैरात करण्यात आली. आताप्रचारासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत.