स्टॉल हटविल्याने खाद्यपदार्थ, पाण्याअभावी पर्यटकांची गैरसोय

स्टॉल हटविल्याने खाद्यपदार्थ, पाण्याअभावी पर्यटकांची गैरसोय
Published on
Updated on

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : सिंहगडावर रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. मात्र, अतिक्रमण हटाव कारवाईत विक्रेत्यांचे स्टॉल जमीनदोस्त केल्याने गड व गडाच्या मार्गावर खाद्यपदार्थ, पाणी न मिळाल्याने पर्यटकांना गैरसोय सहन करावी लागली. त्यामुळे गडाच्या पायथ्याला डोणजे-गोळेवाडी टोल नाक्यावर पर्यटकांना गडावर जाताना खाद्यपदार्थ, पाणी घेऊन जाण्याचे आवाहन वनविभागाकडून स्पीकरवरून केले जात होते.

गडावरील वाहनतळासह गड व गडाच्या मार्गावरील 138 खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे स्टॉल व हॉटेल वन खात्याने शुक्रवारी भुईसपाट केले. परिणामी, शनिवारी तसेच आज गडावर हजारो पर्यटकांना खाद्यपदार्थ, पाण्याअभावी गैरसोय सहन करावी लागली. सिंहगडाच्या अलीकडच्या वीस ते पंचवीस वर्षांच्या इतिहासात कोरोना संसर्गाचा अपवाद वगळता प्रथमच दही, ताक, झुणका-भाकरी असे खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या स्थानिक महिला, रहिवाशांचा रोजगार बंद झाला आहे. घेरा सिंहगड,अवसरवाडी, मोरदरी, आतकरवाडी, कल्याण आदी ठिकाणच्या मुकुंद खाटपे, राजेंद्र डिंबळे, राणी जरांडे, मंगल शिरोळे, गीता गोपने, सुदाम मंडले, तानाजी भिकाजी चव्हाण आदी विक्रेत्यांच्या कुटुंबावर उपासमारीची टांगती तलवार आहे.

काही पर्यटकांनी मात्र गडावरील टपर्‍या हटविण्यात आल्याने समाधान व्यक्त केले. घाट रस्त्यावर, तसेच गडाच्या मार्गावरील टपर्‍या हटविण्यात आल्याने गडाचे मूळ स्वरूप, ऐतिहासिक वारसा पाहायला मिळत आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यटकांनी केले आहे.
दुसरीकडे गडावरील काही विक्रेत्यांनी खाद्य पदार्थ, पाण्याच्या दरात वाढ केली. सरकारी विश्रामगृहातही खाद्यपदार्थ विक्री सुरू आहे.

तिथे प्रचंड गर्दी होती. दिवसभरात जवळपास दहा ते पंधरा हजारांवर पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलमध्ये अक्षरशः झुंबड उडाली होती. दरम्यान, वनविभागाने नियोजित ठिकाणी स्टॉल उभारण्याचे आवाहन विक्रेत्यांना केले आहे. मात्र, अद्यापही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. येरवडा येथील पर्यटक शुभम पवार म्हणाले, की पाण्याची बाटली मिळाली नाही. खाण्याची अडचण झाली. त्यामुळे नेहमीसारखा सिंहगड अनुभवता आला नाही. धायरी येथील संतोष वरपे म्हणाले, की सिंहगडावर सहज मिळणारे दही, ताक, झुणका, भाकर मिळाली नाही.

नियोजित जागेवर स्टॉल उभे करा
पुणे वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, सिंहगड विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके यांनी नियोजित जागेवर विक्रेत्यांनी स्टॉल उभारावे, असे आवाहन केले आहे. वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके म्हणाले, की पायथ्यापासून गडाच्या माथ्यापर्यंत विखुरलेल्या विक्रेत्यांचे गडावर एकाच ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. नोंद असलेल्या 71 विक्रेत्यांना स्टॉलसाठी समान जागा दिली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news