पिंपरी : …त्या दुकानदारांकडे मात्र कानाडोळा ब्लॅक फिल्मिंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई

पिंपरी : …त्या दुकानदारांकडे मात्र कानाडोळा ब्लॅक फिल्मिंगवर वाहतूक पोलिसांची कारवाई
Published on
Updated on

पिंपरी : काळ्या काचा असणार्‍या वाहनांवर वाहतूक पोलिसांची जोरदार कारवाई सुरू आहे. मात्र, वाहनांच्या काचांवर नियमबाह्य पद्धतीने ब्लॅक फिल्म लावून देणार्‍या दुकानांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. ब्लॅक फिल्मिंग समूळ नाश करायचा असल्यास फिल्म लावून देणार्‍या दुकानदारांसह उत्पादकांवरही कारवाई करण्याची गरज असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहर परिसरात कार अ‍ॅक्सेसरीजची दुकानेदेखील वाढली आहेत. दरम्यान, अलीकडे वाहनांच्या काचा काळ्या करण्याची क्रेज तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहे. मात्र, पारदर्शी नसलेल्या काचांमुळे वाहनांतून अवैध कामे किंवा गुन्हे घडण्याची शक्यता असते.

या पार्श्वभूमीवर शासन निर्णयानुसार पोलिस काळ्या काचा असणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई करतात. काळ्या रंगाची फिल्म लावण्यांवर अंकुश ठेवण्याचा या कारवाईमागील उद्देश आहे. मात्र, अलीकडे नवीन कारला अतिरिक्त 'अ‍ॅक्सेसरीज' लावण्यासाठी दुकानांमध्ये गेल्यानंतर काचांवर ब्लॅक फिल्म लावण्याचे सल्ले दिले जातात. काळी काच असल्याने वाहनांचा 'लूक' बदलत असल्याचे सांगून काहीजण काळ्या फिल्म लावण्यास भाग पाडतात. अनेकजण भूलथापांना बळी पडून वाहनांचा काचा काळ्या करतात. प्रामुख्याने नाशिक फाटा येथे अशा प्रकराची फिल्म लावून देणारी दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.अशा दुकानांवर पोलिसांनी स्पेशल ड्राइव्ह घेऊन कारवाई करण्याची गरज आहे.

'आरटीओ' अप्रूव्हल असल्याचे सांगून फसवणूक
नवीन वाहन दुकानात घेऊन गेल्यानंतर चालक साधारण सीटकव्हर, डॅश बोर्डवर शोभेच्या किंवा देवदेवतांच्या छोट्या मूर्ती लावून घेतात. अशा वेळी दुकानदार काचेवर फिल्म लावून घेण्याचा सल्ला देतात. काचेतून थेट येणारा सूर्यप्रकाश कारचे इंटेरिअर खराब होत असल्याचे सांगितले जाते. तसेच, कारमधील उष्णता कमी करण्यासाठी फिल्म कशाप्रकारे आवश्यक आहे, हे पटवून दिले जाते. ग्राहकाने होकार दिल्यास फिल्म लावणारे आरटीओ अप्रूव्हल असल्याचे सांगून फिल्म लावतात. प्रत्यक्षात मात्र कार रस्त्यावर आल्यानंतर पोलिस ऑनलाईन चलन टाकून मोकळे होतात, अशा प्रकारेदेखील वाहनचालकांची फसवणूक  केली जाते.

उदा. चिमुरड्याच्या खुनापूर्वी केली  होती फिल्मिंग
अद्दल घडवण्यासाठी एका तरुणाने शेजारी राहणार्‍या बांधकाम व्यावसायिकाच्या सात वर्षाच्या चिमुरड्या मुलाचे अपहरण करून त्याचा गळा दाबून खून केला. ही घटना 9 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा एमआयडीसी भोसरी परिसरात उघडकीस आली. यातील आरोपीने घटनेपूर्वी काही दिवस आधीच कारच्या काचांना डार्क ब्लॅक फिल्म लावून घेतली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी डार्क फिल्म असलेल्या संशयित वाहनांवर ऑनलाईन चलनसोबतच वाहने तपासण्याचीदेखील गरज आहे.

….म्हणून कारवाई आवश्यक
वाहनांना काळ्या काचा लावल्यामुळे आत कोण बसले आहे, ते काय करत आहेत, हे समोर येत नाही. त्याचा गैरफायदा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. खून, बलात्कार, दरोडा याबरोबर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणार्‍यांनीदेखील काळ्या काचांचा आडोसा घेतल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देशातील अशा सर्व फिल्मिंग तातडीने उतरविण्याचा व त्या बसविण्याला प्रतिबंध करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पोलिस महासंचालकांनीही सर्व पोलिस आयुक्त व अधीक्षकांना काळ्या काचांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी ब्लॅक फिल्मिंगची कारवाई आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news