टाकवे बुद्रूक : पाणी नसल्याने नाणेमावळातील शेती होतेय कोरडी

टाकवे बुद्रूक : पाणी नसल्याने नाणेमावळातील शेती होतेय कोरडी
Published on
Updated on

टाकवे बुद्रूक; पुढारी वृत्तसेवा : धरण क्षेत्र सखल भागात असून, अनेक गावे उंच टेकड्यांवर असल्यामुळे शेतजमिनी पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे वडिवळे कालव्यातील पाणी शेतीला सोडा, अशी मागणी नाणे मावळातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे. नाणे मावळमधील अनेक वर्षांपासून निर्जीव झालेला वडिवळे धरणाचा कालवा हा गेल्या वर्षी शेतकर्‍यांसाठी सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या पाठपुराव्यामुळे खुला करण्यात आला होता. गेल्या वर्षी आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते कालव्याचे पाणी शेतकर्‍यांना उपलब्ध करण्यात आले. मात्र, काही दिवसांपासून व काही कारणास्तव बंद करण्यात आलेले पाणी मिळण्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी वडिवळे पाटबंधारे विभागाला अर्ज केला आहे.

वडिवळे धरणातील नाणे मावळातील करंजगाव, उकसान, साबळेवाडी, गोवित्री, कांब्रे, नाणे, कामशेत, नाणोली, जांभूळ, कान्हे, वडगाव आदी महत्त्वाच्या गावांसह आजूबाजूच्या छोट्या वाड्या-वस्त्यांना वरदान म्हणून लाभलेले हे धरण आहे. या धरणाच्या पाण्यावर अनेक गावांमधील शेती क्षेत्र सिंचनाखाली येते. पाणीपरवाना असलेल्या शेतकर्‍यांना या धरणाच्या पाण्याचा शेतीच्या सिंचनासाठी फायदा होत आहे. दरम्यान, पाणी परवाना नसलेल्या व सिंचनाची सुविधा नसलेल्या शेतकर्‍यांना पाण्याचा प्रश्न उभा राहत असल्याने वडिवळे कालवा हा स्थानिक शेतकर्‍यांच्या शेतीच्या सिंचणासाठी एक पर्याय म्हणून उपलब्ध करण्यात आला आहे.

मात्र, पाणी उशाला कोरड शेतीला, अशी परिस्थिती झाली आहे. कालव्यातून पाणी उपलब्ध होत नसल्याने करंजगाव, कांब्रे, कोंडीवडे, नाणे येथील शेतकर्‍यांनी वडिवळे पाटबंधारे विभागाला अर्ज केला आहे. कालव्यातून पाणी सोडले तर ऊस, ज्वारी, बाजरी, मका व बागायती पिके घेता येतील तसेच शेतकर्‍यांच्या जनावरांसाठी चारा व पाण्याची सोय होईल. नियमाप्रमाणे पाणी सोडल्यास शेतकरी अनेक प्रकारची पिके घेऊन आपले जीवन समृद्ध करू शकेल, असे या अर्जात म्हटले आहे.

काही ठिकाणी ऊसतोडीमुळे, काही ठिकाणी लिकेज असल्याने तसेच काही शेतकर्‍यांच्या लागवडीची तयारी सुरू असल्याने कालव्यातील पाणी बंद करण्यात आले होते. जशी मागणी येईल त्याप्रमाणे पाणी सोडण्यात येईल.

                    -मनोहर खाडे, शाखा अभियंता, वडिवळे पाटबंधारे विभाग

नाणे गावाशेजारी माझी जमीन आहे, तसेच माझ्याबरोबर अनेक शेतकरी या भागात आहेत तिथेच वडिवळे कालव्याचा शेवट होतो. सिंचनाची सुविधा नसल्याने पाण्याची अडचण होऊन शेती पडीक राहत आहे. कालव्याचे पाणी मिळाले तर काही पिके त्या जमिनीत घेता येईल.
                          – रोहिदास असवले, माजी उपसरपंच, टाकवे बुद्रुक

नाणेमध्ये पुनर्वसन झालेली नवीन उकसानवाडी येथे कालव्याचा शेवट झालेला आहे, तेथून पुढे साई वाउंड कचरेवाडी, देशमुखवाडी घोणशेत खरमारेवाडी या भागात शेतीसाठी पाणी मिळावे यासाठी संबंधित विभागाशी मीटिंग होऊन करून सर्व्हे करण्यास सांगितले. मात्र, हा भाग उंचावर असल्यामुळे पाणी येणे शक्य होणार नाही, असा अहवाल मिळाला. परंतु यासाठी पर्याय म्हणून उंचावरील जमिनीच्या ठिकाणी खोदकाम करून अंतर्गत पाईपलाईनची गरज आहे.
                                    – गजानन खरमारे, शेतकरी, घोणशेत

टाकवे बुद्रुकपासून आंध्रा व ठोकळवाडी धरण जवळ आहे. मात्र, टाकवे गाव धरण सपाटीपासून खूप उंचीवर असल्याने शेतीसाठी कालवा करून पाणी आणणे शक्य नाही. त्यामुळे वडिवळे कालव्याचे पाणी नवीन उकसानवाडी,साई, घोणशेत या मार्गी पुढे टाकवे बुद्रूकला उपलब्ध करून द्यावे, यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असे झाल्यास हजारो एकर शेती बागायतीखाली येईल.
 

                               -बाबाजी गायकवाड, शेतकरी, टाकवे बुद्रूक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news