

वाल्हे (ता. पुरंदर); पुढारी वृत्तसेवा : वाल्हे गावासाठी मंजूर असलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मागील अनेक वर्षांपासून जागेअभावी अजूनही कागदावरच राहिलेली आहे. परिणामी, रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. तातडीने जागा उपलब्ध करून इमारतीचे बांधकाम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वाल्हे येथील बस स्थानकालगत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्रांतर्गत राख, नावळी, जेऊर, पिसुर्टी, आडाचीवाडी, हरणी, पिंगोरी, वागदरवाडी, सुकलवाडी, दौंडज आदी गावे येतात. या गावातील एकूण लोकसंख्या 21 हजार 629 इतकी आहे. तर आरोग्य केंद्रात दरमहा 1 हजार 200 रुग्ण तपासणीसाठी येतात. सद्यःस्थितीत असलेली इमारत सुमारे 35 ते 40 वर्षे जुनी आहे. केंद्राच्या एका बाजूने रेल्वेचे विस्तारीकरण सुरू आहे; तर दुसर्या बाजूने राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरणाचे काम जोरदार सुरू आहे.
या दोन्ही कामांत आरोग्य केंद्राची किती जागा जाते हे अद्यापी स्पष्ट झाले नाही. त्यामुळे या केंद्राचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ही अडचण विचारात घेत आरोग्य विभागाकडून या ठिकाणी सुसज्ज इमारत बांधण्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून इमारतीसाठी शासनाकडे केलेल्या जागेच्या मागणीबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सुसज्ज इमारतीअभावी रुग्णांना आरोग्य सेवा देताना येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यावर मर्यादा येत आहेत.
गावामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुक्कामी असतो. तसेच आद्यरामायणकार महर्षी वाल्मीकी ॠषींची संजीवनी समाधी मंदिर असल्याने देशभरातून भाविक-भक्त या ठिकाणी वर्षभर येत असतात. त्यामुळे येथील आरोग्य केंद्राच्या सुसज्जतेची गरज आहे. येथे सर्व सुविधांयुक्त असे उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवरील रुग्णालय होणे आवश्यक आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सुसज्ज प्रसूती कक्ष, बैठक हॉल, कर्मचार्यांच्या निवासस्थांनासह इमारत राष्ट्रीय महामार्गालगत झाल्यास परिसरातील अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळतील. तसेच नागरिकांना आरोग्यविषयक उत्तम सेवा-सुविधा उपलब्ध होतील.
वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतीसाठी अनेकांच्या पाठपुराव्याने जवळपास साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. जागेची मोजणी प्रक्रिया सुरू असून, या आठवड्यात ती पूर्ण होईल. तसेच जमीन मोजणी अहवाल पुढील प्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेस सादर करण्यात येईल. त्यानंतर नवीन इमारतीचा आराखडा तयार करून, निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.
– अमोल खवले, सरपंच, वाल्हे.
शासनाच्या नियमानुसार सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी दोन एकर जागा आवश्यक आहे. अनेक गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एवढ्या मोठ्याप्रमाणात जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे, इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध असूनही जागेअभावी काम खोळंबले आहे.
– डॉ. विक्रम काळे, वैद्यकीय अधिकारी, पुरंदर.