बेल्हे: सलग आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आणे पठारावरील काही अपवाद वगळता बहुतांश केटी बंधारे, पाझर तलाव 100 टक्के भरले आहेत. तसेच विहिरी, बोअरवेलच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.
आणे पठारावर दुष्काळग्रस्त भागांमध्ये गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये बंधारे व पाझर तलाव भरले होते. परंतु, या वर्षी हेच पाझर तलाव मे महिन्यामध्येच पूर्ण भरले आहेत. शिंदेवाडी गावातील सर्वच तलाव व बंधारे शंभर टक्के भरल्याची माहिती माजी सरपंच रोहिदास शिंदे यांनी दिली. (Latest Pune News)
गेल्या वर्षी या भागात अत्यल्प पाऊस झाला होता. जानेवारी ते जुलै, ऑगस्ट महिन्यापर्यंत या भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू होते, तर जनावरांच्या चार्यासाठी वनवन फिरावे लागत होते.
अनेक भागात पावसामुळे ओढ्या- नाल्यांना पूर आला. यंदा मे महिन्यात या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच पूर्व भागातील बांगरवाडी, राजुरी, आळेफाटा, आळे, निमगाव सावा, बेल्हे, गुंजाळवाडी, गुळुंचवाडी, तांबेवाडी, साकोरी, बोरी या सर्व गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
काही भागात या पावसाने नुकसान केले आहे. आंबे, कांदे, बीट, टोमॅटो, उन्हाळी बाजरी, जनावराचे खाद्य, इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत.