पुणे : सुका नशा देणार्‍यांची झिंग उतरवली; अडीच वर्षांत साडेतेरा कोटींचे अमली पदार्थ जप्त

पुणे : सुका नशा देणार्‍यांची झिंग उतरवली; अडीच वर्षांत साडेतेरा कोटींचे अमली पदार्थ जप्त
Published on
Updated on

महेंद्र कांबळे

पुणे : कधी काळी 'दम मारो दम…' या गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. नुकताच 'उडता पंजाब' चित्रपट नशाखोरीचे वास्तव दाखवून गेला. शहरातील तरुणाई याच वाटेने जात असून, याचे जाळे विस्तारत आहे. यावरच पोलिसांनी आता थेट घाव घालण्याचे काम सुरू केले आहे. गेल्या 29 एप्रिल रोजी केलेल्या कारवाईत तब्बल 2 कोटी 21 लाखांचे अमली पदार्थ गुन्हे शाखेने पकडले अन् तिघांना जेरबंद केले.

शहराचा वाढत्या नावलौकिकामुळे शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने परराज्यासह विदेशातील तरुण-तरुणी मोठ्या संख्येने पुण्यात वास्तव्यास आहेत. सांस्कृतिक शहर म्हणून ओळख निर्माण करणा-या या शहराच्याभोवती निर्माण झालेले आयटी क्षेत्राचे वलय, गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या, त्यातूनच उदयास आलेली संस्कृती.

त्यामुळे मुंबईपाठोपाठ अमली पदार्थ तस्करांच्या रडारवर पुणे शहर असतानाच पुणे पोलिसांनी अमली पदार्थ तस्कारांचे प्रयत्न हाणून पाडत सुका नशा देणार्‍यांची झिंग उतरवली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 'नशाखोरी'ला कारवाईचा डोस देण्यात आला आहे.

गोवा, मुंबई येथून कोकेन, ब्राऊन शुगरची तस्करी होत होती. आता यात हरियाणा आणि मध्यप्रदेश येथूनदेखील पुण्यात अमली पदार्थाची तस्करी होत असल्याचे कारवायांवरून समोर आले आहे. शहरातील कोरेगाव पार्क, मुंढवा, बाणेर, हिंजवडी येथील उच्चभ्रू परिसरातील पब, हॉटेलमध्ये त्याची ग्राहकांना विक्री करताना अनेक जण पकडले देखील गेले आहेत.

व्यवसाय गुंतागुंतीचा

देशातील अमली पदार्थाचा व्यवसाय गुंतागुंतीचा आहे. झोपडपट्टी, लेबर कॅम्पपासून ते आलिशान वस्त्यांपर्यंत सर्वत्र अमली पदार्थ चोरट्या मार्गाने उपलब्ध करून दिले जातात. सामाजिक माध्यमातून वैयक्तिकरीत्या ग्राहक आणि त्यांना अमली पदार्थ पुरविणार्‍यांचा प्रयत्नही नुकताच हाणून पाडण्यात आला होता.

अशी आहे परिस्थिती

वर्ष गुन्हे अटक आरोपी जप्त अमली पदार्थांची किंमत (रुपयांत)
2021 70 118 2 कोटी 62 लाख 84 हजार
2022 118 167 6 कोटी 84 लाख
2023 29 41 3 कोटी 87 लाख
एकूण 217 326 13 कोटी 33 लाख 84 हजार

अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. कारवाई केल्यानंतर गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाण्याचा आमचा मानस आहे.

                                   – अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news