पिंपरी : ‘पीएमआरडीए’तील अनधिकृत बांधकामांवर ड्रोनची नजर

पिंपरी : ‘पीएमआरडीए’तील अनधिकृत बांधकामांवर ड्रोनची नजर

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापरासाठी ड्रोन घेतला आहे. या ड्रोनद्वारे पीएमआरडीए प्रशासनाला नगररचना योजना, सुविधा भूखंड हस्तांतर प्रकिया करण्यासाठी उपयोग होईल. त्याचप्रमाणे, पीएमआरडीए क्षेत्रात होणार्‍या अनधिकृत बांधकामावर नजर ठेवण्यासाठी या ड्रोन प्रणालीचा वापर करता येणार आहे.
पीएमआरडीए कार्यालयाकडून गेल्या वर्षीपासून म्हणजेच ऑगस्ट 2022 पासून ड्रोन प्रणाली वापरण्यात सुरुवात झाली.

पीएमआरडीएकडे यापूर्वी दोन ड्रोन आहेत. मात्र, त्यांची एका वेळी उडण्याची क्षमता 20 मिनिटे इतकीच आहे. तसेच, ते एका झेपेत 15 ते 16 हेक्टर इतक्याच क्षेत्रापर्यंत जाऊ शकत होते. आता नव्याने घेतलेल्या ड्रोनमध्ये डीजीपीएस आणि सीओआरएस या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. या ड्रोनची हवेत एका वेळी 45 मिनिटे उडण्याची क्षमता आहे.

तसेच, या ड्रोनने हवेत एकदा झेप घेतल्यानंतर जवळपास 60 हेक्टर क्षेत्रापर्यंत तो जाऊ शकतो. त्यामुळे तितक्या क्षेत्रातील छायाचित्रे घेता येणे शक्य आहे. पीएमआरडीए हद्दीत 814 गावांचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या क्षेत्राची निगराणी ठेवण्यासाठी पीएमआरडीएकडून अद्ययावत तंत्रज्ञान असलेला ड्रोन खरेदी करण्यात आला आहे. या ड्रोनचे प्रात्यक्षिक शुक्रवारी (दि. 21 ) पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंघला यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजन केंद्राचे (एमआरएसएसी) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, सर्वे ऑफ इंडियाचे (पुणे) अधीक्षक सर्व्हेअर एस. त्रिपाठी, भूमी अभिलेख विभागाचे (पुणे) जिल्हा अधीक्षक सूर्यकांत मोरे, नगररचना विभागाचे (पुणे) सहसंचालक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.

पीएमआरडीए कार्यालयातील ड्रोन कक्षासाठी विशेष कौशल्य असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. हा कक्ष पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत राहणार आहे. या कक्षात मुख्य भौगोलिक माहिती तज्ज्ञ डॉ. प्रीतम वंजारी कार्यरत असतील.

पीएमआरडीएच्या नगररचना योजनांची आखणी व विकास, नदी सुधार प्रकल्प, रस्ते रुंदीकरण व सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण यासाठी पीएमआरडीए ड्रोनच्या नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणार आहे.

                            – रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी, पीएमआरडीए.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news