

पुणे: आगामी महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभागरचना आज शुक्रवारी (दि. 22) सायंकाळी उशिरा अथवा थेट शनिवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगापुढे प्रारूप आराखड्याच्या पडताळणीचे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण न झाल्याने आज दुपारपर्यंत ते पूर्ण होईल. त्यानंतरच ही प्रारूप रचना जाहीर केली जाईल, असे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिकांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सहा महिन्यांत घेण्याचे आदेश मे महिन्यात दिले. (Latest Pune News)
त्यानुसार राज्य शासनाने जून महिन्यात चारसदस्यीय प्रभागरचनेचा निर्णय घेत प्रभागरचना करण्याचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार महापालिकेने 5 जुलैला प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा तयार करून राज्य शासनाला पाठविला होता.
नगरविकास खात्याकडून राज्य निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर पडताळणी होऊन महापालिकेकडून हा आराखडा जाहीर करण्यासाठी 22 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेच्या निवडणूक विभागातील अधिकारी-कर्मचार्यांना गुरुवारी मुंबईत बोलाविण्यात आले होते.
मात्र, रात्री उशिरापर्यंत हे पडताळणीचे काम पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा या अधिकार्यांना आयोगाकडून बोलाविण्यात आले आहे. त्यानुसार पडताळणीचे काम दुपारी बारापर्यंत पूर्ण होईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.
त्यानंतर सायंकाळपर्यंत या रचनेचा आराखडा जाहीर केल जाईल. मात्र, आराखडा घेऊन पुण्यात येण्यास उशीर झाल्यास शुक्रवारी सकाळी हा आराखडा जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आज ठरलेल्या मुहूर्ताप्रमाणे प्रारूप प्रभागरचना जाहीर होणार का? याकडे राजकीय इच्छुकांचे लक्ष लागले आहे.
मुंबईत पुन्हा बदल झाल्याची चर्चा
महापालिकेने केलेल्या प्रभागरचनेत राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा होती. त्यानुसार शहराच्या मध्यवस्तीत एका भागात तसेच सॅलिसबरी पार्क-मार्केट यार्ड या परिसरात तीन सदस्यांचे दोन वेगवेगळे प्रभाग करण्यात आल्याची चर्चा होती.
मात्र, नगरविकास विभागात पुन्हा या रचनेच्या आराखड्यात बदल करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यानुसार त्रिसदस्यीय तीन प्रभाग रद्द करून कात्रज भागात पाच सदस्यांचा एक प्रभाग करण्यात आल्याची चर्चा गुरुवारी रंगली होती. याशिवाय रचनेवरून नगरविकास खात्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातही प्रभागरचनेवरून रस्सीखेच रंगल्याची चर्चा आहे.
प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात नकाशे लावणार
राज्य निवडणूक आयोगात आज दुपारी बारापर्यंत प्रारूप प्रभागरचनेच्या आराखड्याची पडताळणी पूर्ण झाली, तर सायंकाळपर्यंत आराखड्याचे गॅझेट जाहीर करून रचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात त्या त्या भागातील प्रारूप प्रभागांच्या आराखड्यांचे नकाशे लावण्यात येणार आहेत.
तर महापालिकेच्या मुख्य इमारतीत संपूर्ण प्रभागरचनेचा आराखडा लावण्यात येईल. त्यावर येत्या दि. 4 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना हरकती-सूचना नोंदविता येतील. त्यासाठी महापालिकेच्या संकेतस्थळावर अथवा ई-मेल आणि महापालिकेत पोस्टाच्या माध्यमातून या हरकती-सूचना स्वीकारण्याची सोय केली जाईल, असे निवडणूक उपायुक्त प्रसाद काटकर यांनी सांगितले.