

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'आपले हात घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी सुद्धा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करावी. भंडारा डोंगर येथे उभारण्यात येणार्या संत तुकाराम महाराजांचे सुवर्णजडित गाभारा मंदिर संपूर्ण मानवजातीच्या उन्नतीसाठी व समाजाच्या सुसंस्कारासाठी उपयुक्त असेल,' असे विचार एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
संत तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी एमआयटी शिक्षण समूहाच्या वतीने डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या हस्ते दीड कोटी रुपयांचा धनादेश विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, या वेळी ते बोलत होते.
एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित कार्यक्रमात एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिक्षणतज्ज्ञ डॉ. एस. एन. पठाण, डॉ. संजय उपाध्ये, दामोदर शिंदे आदी उपस्थित होते. एमआयटी यूटीएमच्या शैक्षणिक संस्थांचे 54 हजार विद्यार्थी, 2500 शिक्षक व 3500 शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने हेे मौलिक योगदान दिले आहे.
डॉ. कराड म्हणाले, 'या सुवर्णजडित मंदिराच्या माध्यमातून भारताच्या वैभवात भर पडेल. अशा या पवित्र स्थळाचे पावित्र्य व त्याचा अद्भूत इतिहास आपण कर्तव्य भावनेतून जपून ठेवावा.' काशिद म्हणाले, 'भंडारा डोंगर येथे जवळपास 150 कोटी रुपये खर्च करून मंदिर निर्मितीचे कार्य सुरू आहे. एमआयटी संस्थेकडून मिळालेल्या या निधीचा खूप मोठा वाटा आहे.' डॉ. संजय उपाध्ये यांनीही विचार मांडले. डॉ. मिलिंद पांडे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.