दिगंबर दराडे
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लिपिक आणि अव्वल कारकुनांच्या दीडशेपेक्षा अधिक बदल्या नुकत्याच केल्या आहेत. दर वर्षी चर्चेत येणार्या बदल्या या वेळी कसल्याच प्रकारे चर्चेत आलेल्या नाहीत. जिल्हा प्रशासनात हव्या त्या आणि नियमात बसणार्या ठिकाणी पोस्टिंग देण्याच्या सूचना त्यांनी केल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
एप्रिल- मे महिन्यांत बदल्यांचे वारे सुरू होते. या वेळी मात्र कोणतीही चर्चा न होता प्रशासनात बदल्या केल्याचे वास्तव समोर आले आहे. महसूल विभागात मोठी बदली प्रक्रिया राबवली गेली. या बदल्यांमध्ये 80 अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तर 70 लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत. बदलीच्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने घाईगडबडीत बदलीच्या ठिकाणी जावे लागल्याचे समजते. जिल्ह्यात प्रथमच महसूल विभागात मोठी बदल्यांची प्रक्रिया राबवली गेली. शिस्तबद्ध पद्धतीने बदली प्रकिया पार पडल्यामुळे राजकीय नेत्यांना बदल्यांच्या प्रक्रियेत फारसा हस्तक्षेप करता आलेला नाही.
जिल्हा प्रशासनात काही दिवसांपासून बदल्यांचे वारे वाहू लागले होते. अनेक कर्मचार्यांच्या बदल्याच झाल्या नसल्याचे निदर्शनास येत होते; मात्र यंदा मे व जूनमध्ये जिल्ह्यात तब्बल 150 कर्मचार्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे 2023 हे वर्ष बदल्यांचे वर्ष म्हणून बोलले जात आहे. मागील दोन वर्षांत कोविडमुळे बदल्यांच्या संदर्भातील नियमावली प्रशासनाने ठरविली होती. त्यामुळे फारशा बदल्या झालेल्या नव्हत्या.
या वेळी मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या आहेत. बहुतांशी रिक्त पदेसुद्धा या वर्षी भरली गेली आहेत. तसेच आता महसूल प्रशासनातील अनेकांना 5 ते 10 वर्षांहून अधिक वर्षे झाल्याने बदली मोहीम या वेळी राबवण्यात आल्याचे आस्थापना शाखेकडून सांगण्यात आले. यात अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहायक व वाहनचालकांचा समावेश आहे. या बदल्यांमुळे आता प्रशासनाने कूस बदलल्याची चर्चा आहे. प्रामुख्याने निवासी उपजिल्हाधिकारी हेमंत खराडे यांच्या जागी ज्योती कदम यांची नियुक्ती झाली आहे. तर अतिरिक्त जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांच्या जागी अजय मोरे यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा प्रशासनात ठाण मांडून बसलेल्या माननीयांना धक्का लावण्यात आला आहे. या मोहिमेमुळे महसूल विभागात 10 ते 15 वर्षे काम करणार्या कर्मचार्यांना आता नवीन ठिकाणी रुजू करण्यात आल्याने थोडा नाराजीचा सूर आहे. काही कर्मचार्यांनी बदली झाल्यामुळे सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महसूल, पुनर्वसन आदी विभागांतील अधिकारी व कर्मचार्यांना हलविल्याने या विभागात नव्या चेहर्यांना संधी मिळाली आहे.