पुणे : पुढारी वृत्तसेवा : पूनावाला यांच्यामुळेच आपला देश कोरोनातून बाहेर पडू शकला. त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता राज्यकर्त्यांनी केवळ 'पद्मभूषण' पुरस्कारापुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करावे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉ. सायरस पूनावाला यांना वनराई फाउंडेशनतर्फे शरद पवार यांच्या हस्ते 'स्व. डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण' पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. पवार म्हणाले, डॉ. मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली. राष्ट्र प्रथम ही मोहन धारिया यांचे विचारसरणी होती. सध्या जगातील पाचपैकी तीन व्यक्ती सायरस पूनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत. सीरम इन्स्टिट्यूटचे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते, त्यांनी दिलेले हे योगदान लक्षात घेता सायरस पूनावाला यांना देशातील सर्वोच्च 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.
पूनावाला म्हणाले, डॉ. मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजन समितीचे उपाध्यक्ष होते, त्या वेळी आमच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले होते, त्यानंतरही त्यांनी आम्हाला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले. आज कोट्यवधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत, ही एकप्रकारे समाधानाची बाब आहे.
डॉ. सतीश देसाई यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविक केले. रोहिदास मोरे यांनी आभार मानले.
डॉ. मोहन धारिया यांनी भारतीय राजकारणाला वेगळी उंची निर्माण करून दिली, त्याचप्रमाणे डॉक्टर सायरस पूनावाला यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेल्या कामामुळे केवळ देशालाच नव्हे, तर जगाला मोठ्या संकटातून दूर केले आहे. सायरस पूनावाला यांचे योगदान हे डॉ. मोहन धारिया यांच्याप्रमाणेच राष्ट्रनिर्मितीचे असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा