माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा नाही का?

माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा नाही का?
पुणे : पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, शहरासह जिल्ह्यातदेखील ज्या ठिकाणी प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन शाळा भरत आहेत, त्या ठिकाणी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होतो आणि माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा लागत नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 च्या पार गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या तडाख्याने विद्यार्थी, नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परीषदेच्या सर्व शाळा 1 एप्रिलपासून सोमवार ते शनिवारी सकाळी साडेसात ते साडेअकरादरम्यान भरविण्यात याव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिले आहेत, परंतु हा निर्णय केवळ जिल्हा परिषदेच्या शाळांपुरताच मर्यादित ठेवला आहे.
 विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळांमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. तरी या मुलांचे वय लक्षात घेता दुपारच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी शाळेच्या वेळेत बदल करून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरविणे गरजेचे आहे. आता दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे वर्ग देखील उपलब्ध आहेत. परंतु तरीदेखील शिक्षण विभागाने दोन सत्रात चालणार्‍या शाळांच्या वेळेत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मात्र उन्हाच्या तडाख्यातच शाळा गाठावी लागत आहे. विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास झाला तर जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

परीक्षेच्या वेळेत करावा बदल

एप्रिल महिना हा विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार अनेक शाळांमध्ये परीक्षेचे पेपर भरदुपारी ठेवण्यात आले आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसून ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका होऊ शकतो. त्यामुळे उन्हाची वेळ टाळून परीक्षा घेण्यात यावी, तसा बदल परीक्षेच्या वेळापत्रकात करण्यात यावी, अशी मागणी पालकांसह शिक्षकांनीदेखील केली आहे.
उन्हाचा तडाखा वाढत आहे. लहान मुलांना उष्माघाताचा त्रास झाला, तर त्याचे किमान चार दिवस वाया जातात. दोन सत्रांत असलेल्या शाळांमध्ये बहुतांशी लहान मुलांचे वर्ग दुपारी भरविण्यात येतात. त्यामुळे किमान लहान मुलांचे वर्ग सकाळी भरविणे गरजेचे आहे. यामध्ये पाचवी ते सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर परीक्षेच्या वेळांमध्येही बदल करून लहान मुलांच्या परीक्षा सकाळीच घेणे गरजेचे आहे.
– विनोद पारे, शिक्षक, भावे हायस्कूल 
उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. मुलांना शाळेत सोडविण्यासाठी तसेच पुन्हा आणण्यासाठी पालकांनादेखील धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे पालकांनादेखील उन्हाचा त्रास होत आहे. उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता सकाळच्या सत्रात शाळा भरविणे अत्यंत गरजेचे आहे. याचा शिक्षण विभागानेदेखील गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
– अशोक शेलार, पालक
हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news