पुणे : पराभवाचे एकमेकांवर खापर फोडू नका : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : पराभवाचे एकमेकांवर खापर फोडू नका : पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कसबा पेठ पोटनिवडणुकीत जनतेने आपल्याला नाकारले आहे. आरोप-प्रत्यारोप करून एकमेकांवर पराभवाचे खापर फोडू नका, वर्षभराने ही जागा आपल्याला पुन्हा जिंकून आणायची आहे, त्यासाठी पुन्हा जोमाने कामाला लागा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कसबा विधानसभा पोटनिवडणूक निकालानंतर पालकमंत्री पाटील यांनी शनिवारी पुण्यात आल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांची भेट घेतली.

रासने यांच्या भेटीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी ते म्हणाले, रासने यांचा अनपेक्षित पराभव झाला. या पराभवानंतर काही कार्यकर्ते निराश झाले आहेत. मात्र, आता वैयक्तिक हेवेदावे करू नका. कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर 2009 च्या निवडणुकीत बापट यांना 58 हजार मते मिळाली होती, तर रवींद्र धंगेकर आणि रोहित टिळक यांना 92 हजार मते मिळाली होती.

या निवडणुकीत आपल्याला 64 हजार मते मिळाली आहेत. आपण चांगला लढा दिला आहे. पुढे महापालिका निवडणुका आहेत, त्या आपल्याला जिंकायच्या आहेत. तसेच वर्षभरानंतर हेमंतला आपल्याला आमदार करायचे आहे. त्यामुळे खचून न जाता सर्वांनी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागावे, आगामी काळात विजय आपलाच आहे, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

बापट यांच्या तब्येतीची विचारपूस
पालकमंत्री पाटील यांनी खासदार गिरीश बापट यांचीही सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी बापट यांच्या तब्येची विचारपूस केली. 'बापट साहेब आपण काळजी घ्या, आणि लवकर बरे व्हा!' अशी सदिच्छा व्यक्त केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news