पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत कुत्र्यांची दहशत

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत कुत्र्यांची दहशत

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी असा नावलौकीक मिळवत असताना, मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या काही दूर होताना दिसत नाही. कुत्र्यांकडूनचावा घेण्याच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. महापालिकेकडून मोकाट कुत्र्यांवर नसबंदी (निर्बिजीकरण) शस्त्रक्रियेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असतानाही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

उघड्यावर व कचराकुंडीत तसेच, टपर्‍या, खाद्यपदार्थ, चायनीज विक्रेते व श्वानप्रेमींकडून सहजपणे खाद्य मिळत असल्याने मोकाट व भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. शहरात अंदाजे एक लाखांच्या आसपास भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. रात्रीच्या वेळी वाहने व पादचार्‍यांवर कुत्री धावून जातात. कुत्री अचानक अंगावर आल्याने त्यांच्या तातडीतून सुटण्यासाठी वाहन पळवितात किंवा पळताना अपघात होत आहेत. रात्रीच्या वेळेत नागरिकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे.

कुत्र्यांच्या चाव्यामुळे तसेच, अपघात होऊन जखमी होण्याचा घटना वाढल्या आहेत. विशेषत: लहान मुलांवर हल्ला करून त्यांचा चावे घेण्याचे प्रकार भटक्या कुत्र्यांकडून वाढले आहेत. वर्षांकाठी तब्बल 10 हजार जणांना कुर्त्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडून कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. एका शस्त्रक्रियेसाठी पालिका 1 हजार रुपये खर्च करीत आहे.

अनेक उपाययोजनासाठी लाखोंचा खर्च करीत आहे. त्यासाठी वर्षाला कोट्यवधीचा खर्च होत आहे. असे असले तरी, शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन राबवावा, अशी मागणी होत आहे.

तक्रारींवर नाही कारवाई
सारथी हेल्पलाइनवर तक्रार केल्यानंतर तक्रारीवर कारवाई न करताच ती क्लोज केली जाते. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत कुत्री पकडण्यासाठी पथक पाठविले जाते. रात्रीच्या वेळेत कुत्री त्रास देत असल्यास त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. त्या तक्रारी उडवून लावल्या जातात. श्वानप्रेमी खाद्यपदार्थ आणून टाकतात. असे श्वानप्रेमी नागरिक कुत्री पडकण्यास विरोध करतात. या तक्रारींकडेही दुर्लक्ष केले जात आहे.

भटक्या कुत्र्यांची संख्या वाढीची कारणे
चायनीज, खाद्यपदार्थ विक्रेते, मास व चिकन विक्रेते व हॉटेल व्यावसायिक तसेच, रहिवाशी कचराकुंडी, गटार किंवा उघड्यावर शिल्लक व शिळे अन्नपदार्थ फेकून देतात. भटकी कुत्री त्या अन्नावर जगत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. कुत्री एका वेळी सुमारे 5 ते 7 पिल्लांना जन्म देते. त्यामुळे कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढते. पालिकेकडून मोठ्या प्रमाणात नसबंदी शस्त्रक्रिया होत नसल्याने कुत्र्यांची संख्या नियंत्रणात येत नाही. मनुष्यबळाची कमतरता असल्याची कारणे पालिकेकडून दिली जात आहेत. प्राणीमित्र मंडळी कुत्र्यांना अन्न आणून टाकतात. कुत्री पकडण्यास काही प्राणीमित्र मंडळी कायदाचा धाक दाखवून अडवणूक करतात.

निवडणुकीत ही गाजला कुत्र्यांच्या नसबंदीचा मुद्दा
कोरोनाच्या पहिल्या लाटेत कडक लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार बंद असताना महापालिकेने मोठ्या संख्येने मोकाट कुत्री पकडून त्यांच्यावर नसबंदी शस्त्रक्रियेच्या बोगस नोंदी करून त्या माध्यमातून कोट्यवधीचा भ्रष्टाचार करण्यात आला. तो मुद्दा चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत गाजला. राष्ट्रवादीने या भ्रष्टाचारावर बोट ठेवत भाजपवर सातत्याने आरोप केले. या प्रकरणावर तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती. आयुक्तांची बदली झाली. मात्र, अद्याप नसबंदीतील गैरव्यवहारा संदर्भातील चौकशी अहवाल समोर आलेला नाही.

प्राण्यांसाठी नेहरूनगरला रुग्णालय
प्राण्यांवर उपचार करण्यासाठी नेहरूनगर येथे प्राण्यांचे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. पाळीव व भटक्या कुत्र्यांसह, मांजर, बैल, गाय, घोडा, गाढव, डुकर, शेळी, मेंढी, म्हैस अशा प्राण्यांवर तेथे उपचार केले जात आहेत. दररोज 100 प्राण्यांवर उपचार केले जात आहेत. जखमी पाण्यावर उपचार करण्यासाठी प्राण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका सुरू करण्यात आली आहे. शहरात जखमी कुत्रा, मांजर व इतर प्राणी आढळून आल्यास 7028714111 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे असे अधिकार्‍यांनी सांगितले.

वर्षाला 10 हजार अ‍ॅन्टी रेबीज इंजेक्शनचा पुरवठा
भटक्या कुत्र्यांच्या चाव्यानंतर संबंधित व्यक्तीस रेबीज हा जीवघेणा रोग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रुग्ण दगावू नये म्हणून अ‍ॅन्टी रेबीजचे इंजेक्शन दिले जाते. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयासाठी भांडार विभागाकडून त्या इंजेक्शनचा पुरवठा केला जातो. जखमींना ते इंजेक्शन मोफत दिले जाते. दरवर्षी अ‍ॅटी रेबीजच्या सरासरी 10 हजार औषधांच्या बाटल्या खरेदी केल्या जातात. रुग्णालयात पुरेसा प्रमाणात औषधे असल्याचे दावा पालिकेच्या अधिकार्‍यांनी केला आहे.

नसबंदी वाढ करण्याचे नियोजन
दररोज 50 भटक्या कुत्र्यांवर नसबंदी करण्यासाठी नेहरूनगर येथील कुत्री नसबंदी केंद्रांवर पिंजर्‍यांची संख्या वाढविण्याचे काम सुरू आहे. पशुवैद्यकीय विभागाचे मनुष्यबळ वाढविण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या दररोज 15 कुत्र्यांची नसंबदी केली जात आहेत. त्यात सर्वांधिक मादी कुत्र्यांची संख्या आहे. नसबंदी शस्त्रक्रियेसाठी स्वयंसेवी संस्था व संघटनांची तसेच, प्राणीमित्रांची मदत घेण्यात येत आहे. कुत्र्यांची समस्या दूर करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांनाही उघड्यावर शिल्लक व खरखटे अन्नपदार्थ टाकू नयेत, असे पशुवैद्यकीय विभागाचे उपायुक्त सचिन ढोले यांनी सांगितले.

कुत्र्यांकडून चावे घेण्याचा घटनेत वाढ
वर्ष नागरिक
2019-20 12,751
2020-21 9,487
2021-22 8,717
2022-23 10,350

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news