वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : केवळ औषधपाण्याने रुग्ण बरे होत नाहीत. त्यासाठी नियमित व्यायाम, शारीरिक श्रम करण्याची गरज आहे. निरोगी आयुष्याचा संदेश देण्यासाठी पुण्यातील दोन डॉक्टरांनी 10 वर्षांत 500 वेळा सिंहगड किल्ला सर केला. पुण्यातील शिवाजीनगर डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब जिने व बिबवेवाडी येथील विधाता क्लिनिकचे डॉ. संजय डुबल पाटील, अशी या डॉक्टरांची नावे आहेत.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांना मानवंदना देऊन दोघांनी पाचशेव्या सिंहगड चढाईचा टप्पा शुक्रवारी (दि. 23) पूर्ण केला. डॉ. जिने व डॉ. डुबल पाटील यांच्या अनोख्या कामगिरीला बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब वळसे पाटील, अभियंता मंगेश फटागरे, सी. ए. जितेंद्र रडेर यांनी साथ दिली.
दहा वर्षांपूर्वी 1 जानेवारी 2013 रोजी डॉ. जिने व डॉ. डुबल पाटील यांनी सिंहगड चढाईचा उपक्रम सुरू केला. रात्रंदिवस रुग्णसेवा करताना ते तरुण, ज्येष्ठ रुग्णांना निरोगी राहण्यासाठी व्यायामाचा सल्ला देत असल्याने आपण हा संदेश तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी स्वतःच प्रत्येक शनिवारी सिंहगड सर करायचा, असा निर्धार त्यांनी केला. सिंहगड चढल्यामुळे आपली प्रकृतीही निरोगी राहील आणि समाजातही निरोगी जीवनाचा संदेश जाईल. हे ध्येय उराशी बाळगून अनेक खडतर प्रसंग, कौटुंबिक, व्यावसायिक अडचणींवर मात करीत दोघांनी 500 वेळा सिंहगड सर करण्याचा टप्पा पार केला.