

पुणे: शहरातील एरंडवणे परिसरात घराच्या ग्रील चोरीवरून झालेल्या वादात, एका महिलेला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ‘माझे दाऊद गँगशी संबंध आहेत,’ असे म्हणत संबंधितांनी घर सोडण्यास भाग पाडले.
तसेच, पोलिसांशी वरपर्यंत ओळख असल्याचे सांगून धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 15 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते 16 ऑगस्टच्या सकाळी सहा या कालावधीत एरंडवणेतील गुलमोहर पथ येथे घडली. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार काही दिवसांसाठी घराबाहेर असताना त्यांच्या मालमत्तेवरील सुमारे 24 हजार रुपये किमतीचे लोखंडी ग्रील अनधिकृतपणे काढून नेण्यात आले. याबाबत त्यांनी संबंधित व्यक्तींना विचारणा केली असता, त्यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत, “आम्हीच ग्रील तोडले आहे, तुला काय करायचे ते कर”, असे म्हटले.
यावेळी, “माझे दाऊद गँगशी संबंध आहेत, तू घर सोडून जा, नाहीतर तुझ्यासह तुझ्या कुटुंबातील सर्वांना संपवीन. तुझा आणि तुझ्या नवर्याचा खून करणे माझ्या हातचा मळ आहे,” अशा शब्दांत धमकी दिली. तसेच पोलिसांशी आमची वरपर्यंत ओळख असल्याचेही सांगण्यात आले.