

पुणे: पालखी सोहळ्यात मोबाईल चोरणार्या दोघा चोरट्यांना मार्केट यार्ड पोलिसांनी जेरबंद केले. गर्दीचा फायदा घेत हे दोघे भाविकांचे मोबाईल चोरी करत होते. त्यांच्याकडून चोरीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
प्रकाश देवराम परिहार (वय 29, रा. लोहियानगर) व त्याचा साथीदार मोहम्मद मनान जमाल शेख (वय 25, रा. मार्केट यार्ड) अशी दोघांची नावे आहेत. यातील आरोपी प्रकाश परिहार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. (Latest Pune News)
दोघांनी शारदा गजानन मंदिराजवळ दिंडीत सहभागी असलेल्या भाविकाचा मोबाईल चोरल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून आणखी दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 20) घडली.
वारीमुळे मार्केट यार्ड भागात भाविकांची गर्दी झाली आहे. या गर्दीत मोबाईल चोरी झाल्याची तक्रार घेऊन भाविक मार्केट यार्ड पोलिसांत आले. त्यांची तक्रार प्राप्त होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील, गुन्हे निरीक्षक सुनीता नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा शोध सुरू केला.
मार्केट यार्ड भागात पेट्रोलिंग करीत असताना पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे, वरिष्ठ निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.