

Dnyanoba Tukoba Palkhi Alandi arrival
आळंदी : आषाढी वारी सोहळा पूर्ण करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या रविवारी (दि. २०) सायंकाळी पाचच्या सुमारास आळंदीत दाखल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आळंदी शहर भक्तिमय वातावरणात न्हालं असून, प्रशासनाकडून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
यंदा माऊलींसोबत तुकोबांची पालखीही आळंदीत येणार आहे. दशमीला तुकोबांची पालखी आळंदीत मुक्कामी राहणार असून, एकादशीला ती देहूला मार्गस्थ होईल. या काळात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि आळंदी पोलिस स्टेशनने १९ ते २१ जुलैदरम्यान वाहतुकीत बदल केले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
आळंदी शहरात प्रवेश करणारे सर्व मुख्य रस्ते या काळात बंद राहतील.
पुणे, मोशी, चिंबळी, मरकळ, वडगाव आणि चाकण मार्गे येणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील.
पर्यायी मार्ग म्हणून शिक्रापूर महामार्ग मार्गे चाकण, वडगाव घेनंद, कोयाळी, मरकळ किंवा नगर महामार्ग मार्गे लोणीकंद फाटा, तुळापूर, मरकळ, आळंदी आणि चऱ्होली बुद्रुक फाटा ते चऱ्होली खुर्द या जोडरस्त्यांचा वापर करता येईल.
पुण्याकडून येणाऱ्या वाहनांसाठी चऱ्होली फाटा-मोशी मार्गे चाकण हा पर्यायी मार्ग उपलब्ध आहे.
प्रशासनाने भाविक आणि वाहनचालकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, तसेच वाहतूक बदलांची माहिती लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवर्जून सांगितले आहे.