उरुळी कांचन: राज्य शासनाच्या गणेशोत्सव राज्य महोत्सव साजरा करण्याच्या निर्णयाने सर्वस्तरांतून स्वागत होत आहे. दुसरीकडे मात्र, जिल्ह्यात गणेशोत्सवातील नियमांबाबत भेद असल्याचेही दिसून येत आहे. हा उत्सव पुणे व पिंपरी चिंचवड शहरांत डीजेमुक्त करावा, असे सांगण्यात येते. तर ग्रामीण भागात डीजे वापराची कमाल मर्यादा ठरवण्यात आली आहे. या दोन नियमांमुळे जिल्ह्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
गणेशोत्सव काळात पुणे शहराप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांनाही मोठ्या प्रमाणात डीजेचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे उच्च न्यायालयाने डीजे वापराचे दिलेले निर्बंध ग्रामीण पोलिसांकडून पाळीत जात नसल्याचे बोलले जात आहे. याबाबत पालकमंत्री अजित पवार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे. (Latest Pune News)
गेल्या वर्षी गणेशोत्सवात डीजेच्या वापराने ह्रदय विकार, बधिरपणा, रक्तदाब तसेच डीजेच्या एलएडी लाईट वापराने डोळ्यांंनाही इजा झाल्या होत्या. या स्थितीतही ग्रामीण भागात डीजेला 65 डेसिबल्सची मर्यादा दिली आहे. मात्र ग्रामीणमधील प्रत्येक मंडळावर लक्ष ठेवणे शक्य होणार नाही. याचा गैरफायदा बहुतांश मंडळे घेतील. त्यामुळे येथे डीजेचा अमर्याद दणदणाट अटळ आहे. त्याचा त्रास ग्रामीण भागातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
डीजेच्या दोन प्रकारच्या परवानग्यांनी ग्रामीण भागातील उत्सवात उथळपणा दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांततेत उत्सव पार पाडण्याच्या पोलिस दलाच्या उद्देशालाच छेद मिळण्याची शक्यता आहे. या दहा दिवसांत ग्रामीण भागात गेल्या वर्षीप्रमाणे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. तसेच अवैध धंदेही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे डीजेबाबत शहरी आणि ग्रामीण असा भेद करून प्रशासन काय साध्य करू पाहत आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
या दोन नियमांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, तर या शहरांंना लागून असलेल्या हवेली, मावळसह इतर तालुक्यात वेगळे चित्र असणार आहे. हवेली तालुक्यातील एका गावात शांतता, तर वेशीवर दुसर्या गावात मात्र दणदणाट असण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक संदिपसिंग गिल यांना संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.