पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरात जागोजागी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे बच्चेकंपनींना किल्ले बनविण्यासाठी माती मिळत नाही. परिणामी पीओपीचे किल्लेच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यांचेही दर वाढले असल्याचे दिसून आले आहे. मातीच्या किल्ल्यांची परंपरा टिकविण्यासाठी मंडळे, संस्था यांच्या वतीने मातीच्या किल्ल्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, बाजारात या किल्ल्यांच्या जागा आता पीओपीच्या किल्ल्यांनी घेतली आहे.
मातीचे किल्ले बाजारात अनुपलब्ध
पूर्वी बाजारात लाल, काळी व पोयटा मातीपासून बनवलेली किल्ले दिसून येत होती. आता मात्र पीओपीपासून बनविलेले राजस्थानी किल्लेच उपलब्ध होत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील कुंभारवाड्यात किल्ले बनत नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
पीओपी किल्ल्याच्या किमती वाढल्या
जीएसटी, डिझेलच्या किमती वाढल्याने किल्ले व मावळ्यांच्या प्रतिकृतींच्या किमतीही वाढल्या आहेत. तसेच पेंटचेही दर वाढले आहेत. किल्ल्यांची किंमत दीडशेपासून हजारापर्यंत आहेत.
मावळ्यांच्या प्रतिकृतीच्या किमती वाढल्या
आकाराने लहान असल्याने फिनिशिंगसाठी खूप वेळ लागतो. कलर, पेंट, देऊन वाळवत ठेवावे लागतात. किमान सहा महिन्यांपासून तयारी सुरू असते.
गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचे किल्ले आणि मावळ्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकदेखील कमी आहे. तसेच दिवाळी सण महिन्याच्या शेवटी आल्याने नागरिकांनीही खर्चासाठी हात आखडता घेतला आहे.
– प्रदीप तिकोणे, विक्रेता चिंचवड.