पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दिव्यांगांचे दुःख, त्यांच्या वेदना हा एखादा दिव्यांग व्यक्तीच समजू शकतो. तोच खरा या गटाचे प्रतिनिधित्व करू शकतो. हेल्पर ते उद्योजक बनून आनंद विष्णू बनसोडे हा बत्तीस वर्षीय दिव्यांग तरुण शेकडो दिव्यांगाना रोजगार देत दिव्यांगांसाठी आधार बनला आहे. 1972 साली पडलेल्या भीषण दुष्काळामुळे रोजगाराच्या शोधात वडील विष्णू हे पिंपरी शहरात स्थायिक झाले. आई शकुंतला यांच्या पोटी जन्मलेल्या आनंदला त्या वेळी पोलिओचा डोस देण्यात आला. मात्र तरीदेखील आनंदला वयाच्या तिसर्या वर्षी पोलिओ झाला. आई गृहिणी तर वडिल मजुरी करीत खाणारे कुटूंब होते. गरिबी आणि पोलिओ असा दुहेरी त्रास आनंदच्या वाट्याला आला.
बालपणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने ते पूर्ण करण्यासाठी आनंद झगडत होता. शाळेची फी आणि कुटूंबाला हातभार लावण्यासाठी तो कधी टेलिफोन बूथ तर मिळेल त्या ठिकाणी अर्धवेळ काम करत शिक्षण घेत होता. भोसरी एमआयडीसीत हेल्पर म्हणूनही त्याने काम केले. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्याने बँकेचे कर्ज काढून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले.
यासाठी आवश्यक व्यावसायिक, वित्त अभ्यासक्रम व सीएनसी डिप्लोमा पूर्ण करून व्यावसायिक कौशल्य आत्मसात केले. 2009 मध्ये आनंद इंजिनिअरिंग या नावाने एका छोट्या लेथ मशीनद्वारे कंपनी सुरू केली.
अपंगत्वामुळे काहींनी काम नाकारले. तसेच काहींनी अभियांत्रिकी क्षेत्रातील दर्जेदार कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या क्षमतेवर अनेकांनी आनंदवर शंका उपस्थित केली. मात्र त्याने कामाबाबतचा प्रामाणिक दृष्टिकोन आणि दर्जेदार ग्राहक सेवा या गुणांवर लक्ष केंद्रित करत ग्राहकांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्याचा व्यवसाय वाढत गेला.
आज ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून सात मोठ्या कंपन्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्याच्याकडे सीएनसी व व्हीटीएल मशीनसह दहा इतर मशीन्स आहेत. तसेच या कंपन्यांमध्ये त्याने दिव्यांगांना रोजगार दिला आहे. येत्या काही दिवसांत आनंद पोल्ट्री फार्म उभारणार आहे. जे पूर्णपणे दिव्यांग लोकांच्या टीमद्वारे चालवले जाणार आहे. आयुष्यातील चढ-उतारात आई, वडील आणि भाऊ दत्ता यांनी साथ दिल्याने तो खंबीरपणे उभा आहे. असे आनंद आवर्जून सांगतो.
सामाजिक जबाबदारी म्हणून त्याने उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना केली. याद्वारे दिव्यांगांसाठी रोजगार मेळावे, चर्चासत्रे व सरकारी योजनांची माहिती व लाभ दिव्यांगांना मिळवून देतो. त्याचा दिव्यांगांसाठी लढा पाहून पिंपरीच्या आमदारांनी शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या अध्यक्ष पदावर आनंदला नेमले. त्या माध्यमातून त्याने शेकडो दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, घटस्फोटीत, तृतीयपंथी अशा एकूण पाचशे लोकांना पेन्शन योजनेचा लाभ मिळवून दिला. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 2019 मध्ये पुरस्कार देऊन त्याला सन्मानित केले आहे.