पुणे : पुणे आणि परिसरातील मालवाहतूक वाहनांचे पासिंग आता हायटेक आणि अत्याधुनिक अशा युरोपियन तंत्रज्ञानाने होणार आहे. याकरिता दिवे घाट येथील आरटीओ कार्यालय परिसरात ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (एटीएस) उभारले जात असून, त्याचे जवळपास 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत म्हणजेच ऑगस्ट 2025 अखेरपर्यंत ते वाहनचालकांच्या सेवेत असणार आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी ‘एआरएआय’ प्रकल्प सल्लागार म्हणून काम पाहत आहे.
दिवे घाटातील हे ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशन (एटीएस) युरोपमधून आयात केलेल्या अत्याधुनिक आणि अचूक यंत्रसामग्रीने सुसज्ज असेल. यात स्वयंचलित ब—ेक टेस्टर, सस्पेन्शन आणि साइड-स्लिप टेस्टर, हेडलाइट अलाइनमेंट सिस्टिम आणि एक्सल प्ले डिटेक्टर यांसारख्या अनेक प्रणालींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही सर्व यंत्रणा एका केंद्रीकृत डिजिटल प्रणालीशी जोडलेली असल्यामुळे मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळता येणार आहे, यामुळे तपासणीमध्ये पारदर्शकता येणार आहे. प्रत्येक चाचणी लेनमध्ये एआय समर्थित व्हिजन सिस्टिम आणि डेटा अॅनालिटिक्स टूल्स असतील, त्यामुळे चाचणीचे निकाल रिअल-टाइममध्ये उपलब्ध होतील. यामुळे वाहनांच्या योग्यतेचे फिटनेस (पासिंग) अचूक मूल्यांकन करणे शक्य होणार आहे. तसेच मानवी चुकांमुळे अयोग्य वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता संपुष्टात येणार आहे.
या केंद्रात दररोज 400 पेक्षा जास्त वाहनांची तपासणी करण्याची क्षमता असेल. यामुळे फिटनेस प्रमाणपत्राची प्रक्रिया जलद होईल आणि अचूकतेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. स्वयंचलित डेटा कॅप्चर आणि त्रुटीमुक्त निदान प्रणाली अपघात आणि वाहन बिघाडांचे प्रमाण कमी करण्यात याची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
दिवे घाटातील एटीएस हे केवळ तपासणी केंद्र नसून, वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे आरटीओने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. रस्त्यावर चालण्यायोग्य वाहनेच रस्त्यावर आणणे, वाहनांमधील तांत्रिक त्रुटींमुळे होणारे अपघात कमी करणे, हा पुणे आरटीओचा मुख्य उद्देश आहे.
अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे