

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शनिवारी (दि. 4) 18 जणांनी 29 अर्ज नेले आहेत. तर, आज कोणीही अर्ज दाखल केलेला नाही. गेल्या पाच दिवसांमध्ये 111 उमेदवारांनी 199 अर्ज नेले आहेत. थेरगाव येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात 31 जानेवारीपासून अर्ज वाटप आणि अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आत्तापर्यंत 4 उमेदवारांनी 5 अर्ज दाखल केले आहेत.
शनिवारी विविध पक्षांच्या 18 जणांनी अर्ज नेले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयूर पांडुरंग कलाटे यांच्यासह अशोक काळभोर, अजय खराडे, संदेश नवले, नितीन खोजेकर, कैलास बनसोडे, राजेंद्र लोंढे, राहुल राऊत, राधाबाई जगताप, समरीन शेख, गणेश जोशी, विजय ओव्हाळ, चारुलता पवार, प्रा. नरेंद्र पवार, अमित अवताडे, राजेंद्र काटे, चेतन ढोरे, भाऊ अडागळे यांचा समावेश आहे. अर्ज वाटप व दाखल करुन घेण्याची मुदत मंगळवारपर्यंत (दि. 7) आहे.