

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह 57 कॅन्टोन्मेंट बोर्डांची सार्वत्रिक निवडणूक शुक्रवारी स्थगित करण्यात आल्याने निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुकांची निराशा झाली, तर निवडणूक जाहीर करायलाच नको होती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक स्थगित करताना कोणतेही ठोस कारण देण्यात आले नाही. मात्र, देशात भाजपविरोधी वातावरण तयार झाल्यानेच निवडणूक रद्द केल्याची चर्चा कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात इच्छुकांमध्ये होती. निवडणुकीत इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी मिळविण्यापासून ते मतदारांची मर्जी राखण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात होते. त्यातच निवडणुका रद्द झाल्याने निराशा झाली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका भाजपने पराभवाच्या भीतीने स्थगित केल्या आहेत. देशभरात भाजपला होत असलेला विरोध, लोकांमध्ये असलेली नाराजी, या भूमिकेतून निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
– मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकॅन्टोन्मेंट बोर्डाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा आणि अन्य एक प्रस्ताव संसदेत मांडण्यात आला आहे. असे असताना निवडणुका जाहीर करण्याची घाई करण्यात आली. जो निर्णय घेण्यात आला, तो योग्य आहे. आता या प्रस्तावावर निर्णय झाल्यानंतर निवडणुका घ्याव्यात.
– संजीव महाजन, माजी उपाध्यक्ष, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डकॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती बिकट असून, उपाध्यक्षांना असलेले अधिकारही पुरेसे नाहीत. त्यामुळे निवडणुका कशासाठी घेतल्या जात होत्या? कॅन्टोमेंन्ट बोर्डाच्या कायद्यात सुधारणांसाठी मसुदा संसदेत मांडलेला आहे. असे असताना ही निवडणूक जाहीर करण्यात आली. निवडणूक रद्द करण्याचा निर्णय योग्य आहे.
– दिलीप गिरमकर, माजी सदस्यनिवडणूक जाहीर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना आपले लोकप्रतिनिधी बोर्डात जातील, त्यातून अनेक विकासकामे होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अचानक निवडणुका रद्द करण्याचा निर्णय म्हणजे या भागातील नागरिकांची फसवणूक आहे.
– अबू सुफियान कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते