

वारजे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका हद्दीत 2017 मध्ये शिवणे, उत्तमनगर या गावांचा समावेश झाला. तसेच कोंढवे धावडे व न्यू कोपरे या गावांचा 2021 मध्ये समावेश झाला आहे. मात्र, या गावांच्या विकासाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असून, महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरदेखील या गावांमध्ये निराशाजनक स्थिती असल्याचे मत परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
महापालिकेत समावेश झाल्यानंतर या गावांचा तातडीने विकास होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, विकासाच्या दिशेने प्रशासनाची पावले पडली असती तर सध्याचे निराशाजनक चित्र दिसले नसते. यामुळे विकासकामांसाठी अजून किती दिवस वाट पहावी लागणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. पाण्याचा अपुरा पुरवठा, जादा कर, यासह वीज, सांडपाणी, कचरा, आरोग्य आदी समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
नितीन धावडे (माजी सरपंच, कोंढवे धावडे) : जनगणनेनुसार शिवणे, उत्तमनगर, कोंढवे व न्यू कोपरे या गावांची लोकसंख्या 48 हजार आहे. मात्र, या गावांची लोकसंख्या साधारणपणे दोन लाखांच्या आसपास आहे. महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतरही सुविधा कमी आणि कर आकारणी जास्त, अशी परिस्थिती आहे. महापालिकेने रेडीरेकनरच्या दराप्रमाणे गावातील करांची आकारणी करावी.
तसेच नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे आहे. यात महापालिका कमी पडली, असेल तर चार गावांची नगरपालिका करण्यात यावी. उमेश सरपाटील (माजी सरपंच) : समाविष्ट गावांचे नागरिकरण झपाट्याने झाल्यामुळे बांधकामे देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. यामुळे परिसरात मोकळ्या जागा फारच कमी शिल्लक आहेत. त्यामुळे या गावांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा नव्याने उभारणे कठीण आहे. महापालिका ही या गावांसाठी सोईस्कर होईल.
विजय इंगळे (मनसे पदाधिकारी) : ही गावे महापालिकेत जाऊन विकासकामे एक टक्कासुद्धा झालेली नाहीत. ग्रामपंचायत काळापासून असलेले रस्ते, सांडपाणी वाहिन्या जैस थे आहेत. या गावांत महापालिकेने विकासकामे केली नाहीत. यामुळे या गावांचा केवळ कर वसूल करण्यासाठी महापालिकेत समावेश केला आहे का? प्रशासनाने पहिल्यांदा चार गावांचा विकास आराखडा तयार करूनच ही गावे महापालिकेत समाविष्ट करायला हवी होती. सध्या सुरू असलेल्या महापालिका प्रशासनाच्या कारभारापेक्षा ग्रामपंचायत बरी होती.
निखिल धावडे (माजी उपसरपंच, कोंढवे धावडे) : ग्रामपंचायत काळामध्ये रस्ता आणि कचरा व्यवस्थापन अगदी चांगल्या प्रकारे होत होते. मात्र, महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर अनेक महिने उलटून गेले, तरी विकासाला अद्यापही चालना मिळालेली नाही. अनेक मूलभूत समस्यांची या गावांमध्ये वाणवा असून महापालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
भगवान गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते) : या गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकासाची अपेक्षा होती, परंतु अद्यापही विकासकामे झालेली नसून प्रशासनाने किमान शाळा, उद्याने, खेळाची मैदाने आणि आरोग्याची सुविधा अशा अनेक मूलभूत समस्या प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे.
ही गावे महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही त्यांचा अद्याप विकास झाला नाही. ग्रामस्थांना अजूनही महापालिकेकडून विकासकामांची अपेक्षा आहे. मात्र, कचरा, वीज, रस्ते अशा अनेक समस्या या भागात अद्यापही कायम आहेत. तसेच जिल्हा परिषदेची शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्राचे अद्यापही महापालिकेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया झाली नाही. यातील सेवा सुरू आहेत. मात्र, आरोग्यासाठी निधी अद्यापही उपलब्ध झाला नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
– अनिता इंगळे, माजी सदस्या, जिल्हा परिषद
शिवणे , उत्तमनगर, कोंढवे , न्यू कोपरे गावातील विकासकामे रखडलेली आहेत. महापालिका कामे करेल, ही अपेक्षा आहे. मात्र, जिल्हा परिषदेची शाळा अत्याधुनिक करण्यासह, प्रशस्त भाजी मंडईसह अनेक विकासकामे अद्यापही प्रलंबित आहेत. महापालिकेने अधिक वेळ न लावता जास्त निधीची तरतूद करून या गावांतील विकासकामे करणे गरजेचे आहे.
– सुभाष नाणेकर, माजी सरपंच, उत्तमनगरया गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर विकासकामे झाली नसल्याने नागरिकांची निराशा झालेली आहे. ग्रामपंचायत काळात असलेल्या सदनिकांवरील करांच्या रकमेत जवळपास पाचपटीने वाढ झाली आहे. त्या तुलनेत महापालिकेने नागरिकांना सुविधा दिल्या नाहीत. येत्या काळामध्ये महापालिकेने रुग्णालय, पार्किंग व्यवस्था व सार्वजनीक स्वच्छतागृह उभारणे गरजेचे आहे.
– सचिन दांगट, स्वीकृत सभासद