बालसाहित्यलेखन जबाबदारीने करावे: ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे मत

बालसाहित्यलेखन जबाबदारीने करावे: ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बालसाहित्यलेखन ही गांभीर्याने आणि जबाबदारीने करायची गोष्ट आहे. अलीकडच्या काळात जे गंभीर लिखाण करीत आहेत ते देखील बालसाहित्यलेखनाकडे वळले पाहिजे. बालसाहित्यातून आपण अद्भुत रस हद्दपार करून टाकला आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी व्यक्त केली.

साहित्य अकादमीच्या वतीने 'समशेर' आणि 'भूतबंगला' या कादंबरींसाठी 'बालसाहित्य पुरस्कार 2024' जाहीर झाल्याबद्दल भारत सासणे यांचा अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते.

ज्येष्ठ लेखक डॉ. न. म. जोशी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे आदी उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल शिरीष चिटणीस यांचाही सत्कार करण्यात आला.

सासणे म्हणाले, बालसाहित्य मोठ्या अक्षरांत आणि केवळ 40-50 पानांपर्यंतच लिहिले जावे, अशी ढोबळ मानांकने भारतीय बालसाहित्याबाबतीत मांडली जाते. परंतु, कथानकात गुंतवून ठेवण्याची ताकद असेल तर 'हॅरी पॉटर'सारखी जाड-जाड पुस्तकेदेखील मुले वाचतात, हे सिद्ध झाले आहे.

डॉ. जोशी म्हणाले की, ज्या साहित्यातून मुलांना सहज आनंद आणि बोध मिळेल, ते खरे बालसाहित्य असते. संपूर्ण साहित्याच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी असलेले साहित्य म्हणजे बालसाहित्य होय. बालसाहित्याचा प्रचार- प्रसार करण्यासाठी कथाकथनासारखे उपक्रम आयोजित करणे आवश्यक आहे.

प्रा. मिलिंद जोशी यांनी अनेकांनी स्वतःचे बालपण डोळ्यांसमोर ठेवून बालसाहित्याची निर्मिती केली. परंतु, पिढी बदलल्याने असे बालसाहित्य संदर्भहीन आणि साधर्म्याच्या पातळीवर अपयशी ठरले. पण, पिढी बदलली आणि कितीही काळ पुढे गेला असला, तरी जगण्याची शाश्वत मूल्ये बदलत नाहीत. ती शाश्वत मूल्ये केंद्रस्थानी ठेवून बालसाहित्याची निर्मिती झाल्यास बालवाचक पुन्हा एकदा बालसाहित्याकडे वळतील, असे वाटते, असे सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news