

पुणे: ‘सर्वांसाठी घरे’ या केंद्र सरकारच्या धोरणानुसार, एकाच वर्षात 30 लाख घरांना मंजुरी मिळाली आहे. मागील 10 वर्षांत सर्व घरकुल योजना एकत्र केल्या, तरी फक्त 13 लाख घरे मंजूर झाली होती.
मात्र, आमच्या सरकारने चालू वर्षातच 30 लाख घरकुलांना मंजुरी दिली असून, त्यामुळे मागील संपूर्ण अनुशेष भरून काढण्यात आला आहे, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. घरकुलांच्या अनुदानासाठी 65 हजार कोटी रुपये वितरित करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Pune News)
विभागीय आयुक्त कार्यालयात ’निर्मल वारी’, ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा’, ’संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान’ आणि ’महाआवास योजना’ अंतर्गत पुरस्कारांचे वितरण गोरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अप्पर आयुक्त नितीन माने व विजय मुळीक उपस्थित होते.
महाआवास व संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान हे ग्रामविकासासाठी महत्त्वाचे असून, ग्रामपंचायतींनी ’मुख्यमंत्री समृद्ध ग्राम स्पर्धा’ यामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही गोरे यांनी केले.
‘वारकर्यांसाठी सर्व सुविधा केल्या आहेत. विठ्ठलासमोर सर्वजण समान आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले असून, मंत्र्यांनाही चालत जावे लागणार आहे. पंढरपूर शहर स्वच्छ व नटलेले असेल आणि कचर्याचा एकही तुकडा दिसणार नाही,‘ असेही गोरे यांनी सांगितले.
महाआवास योजना पुरस्कार वितरण सन 2023-24 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणार्या जिल्हे, तालुके आणि ग्रामपंचायतींना तसेच शासकीय जागा आणि वाळू उपलब्धतेत उत्तम कामगिरी करणार्या तालुक्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुणे जिल्हा परिषदेतर्फे तयार करण्यात आलेली ‘पालखी सोहळा माहितीपुस्तिका’ तसेच ‘वारी व टॉयलेट सुविधा अॅप’ यांचे अनावरण या वेळी गोरे यांच्या हस्ते करण्यात आले.