पुणे : प्रशासकाची बदली होताच डमी अडत्यांचा सुळसुळाट

पुणे : प्रशासकाची बदली होताच डमी अडत्यांचा सुळसुळाट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी आणि फळबाजारातील गाळ्यांवर डमी अडत्यांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. बाजार समितीच्या प्रशासकांची बदली होताच डमींनी पुन्हा हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. गाळ्यापुढे रस्त्यावरच बाजार मांडल्याने हमाल, खरेदीदार व ग्राहक यांना या गर्दीतून वाट काढणे मुश्किल झाले आहे. बाजार समिती प्रशासनाने गुलटेकडी मार्केट यार्डात फुले, फळे, तरकारी विभागात एका गाळ्यावर दोन डमी अडत्यांना मदतनिसाच्या नावाखाली बेकायदा परवानगी दिली.

मात्र, काही अपवाद वगळता एकेका गाळ्यावर डमी अडत्यांची संख्या 4 ते 8 वर पोहचली. डमी अडते गाळेधारक अडतदाराकडून कमी भावात शेतमाल घेऊन त्याची चढ्या भावाने विक्री करतात. यात शेतकर्‍यांच्या शेतमालास प्रत्यक्षात कमी भाव मिळतो, त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होते. तर, डमी अडते गाळ्याच्या समोर पंधरा फुटांच्या बाहेरही शेतमाल विक्री करण्यास बसतात, त्यामुळे बाजारात शेतमालाची ने -आण करणार्‍या वाहनांस वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागतो. तर, हमाल, खरेदीदारांना, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होण्यात वाटा असणार्‍या या डमी अडत्यांवर केवळ तात्पुरती कारवाई करून त्यांना पाठीशी घालण्याची परंपरा प्रशासनाने कायम ठेवल्याचे समोर येत आहे.

एका गाळ्यावर दोन मदतनीसांना परवानगी दिली आहे. त्यापेक्षा जास्त असतील तर संबंधित गटप्रमुखांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जास्त संख्या आढळून आल्यास संबंधितांवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.
                         – बाबासाहेब बिबवे, विभागप्रमुख, भाजीपाला विभाग

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news