बिबवेवाडी : परिसरातील विविध ठिकाणची मैदाने वाढत्या सिमेंटच्या जंगलात हरवून गेली आहेत. महापालिकेच्या मान्यवरांचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, विविध विकासकामे यांमुळे अलीकडच्या काळात मुलांना खेळण्यासाठी मैदाने, उद्याने कमी पडत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्याने आणि मैदानांची दुरवस्था झाली आहे.
उन्हाळ्याची सुटी सुरू झाल्याने विद्यार्थीवर्ग आनंदात आहे. काहीजण मामाचे गाव गाठतात, काही गावी जाण्याचे टाळतात. अशा वेळी आपल्या घराजवळील मैदानात, उद्यानात व मिळेल त्या ठिकाणी कधी बैठे खेळ, तर कधी मैदानी खेळ खेळत विद्यार्थी वेळ घालवतात. पण, अलीकडच्या काळात तत्कालीन माननीय यांच्या महत्त्वाकांक्षेपोटी मोकळी मैदानी आरक्षित करून त्यावर कुठले ना कुठले प्रकल्प उभारले गेले आहेत.
उदा. सांस्कृतिक भवन, उद्याने, विरंगुळा केंद्र, पार्किंगची ठिकाण यासाठी मोकळ्या जागा गुंतवून खूप मोठा विकास केला आहे, असा गाजावाजा तत्कालीन माननीयांनी केला आहे. पण, बालवयात मुलांना खेळण्यासाठी मैदान व विकसित उद्याने असावीत, असा प्रश्न कोणालाही पडला नाही. पण, ही मैदाने किंवा महापालिकेची उद्याने मुलांना खेळण्याच्या लायकीची राहिली नाहीत. बिबवेवाडी अप्पर परिसरातील अनेक उद्याने जणू काही तळीरामांचाच अड्डा बनला आहे.
मुलांना खेळाची मैदाने उपलब्ध नसल्याने ते टीव्ही, मोबाईलपुढे बसलेले असतात. त्यांचा शारीरिक व मानसिक विकास खुंटत चालला आहे. त्याविषयी पालकांनाही चिंता असते. मात्र, मुलांना नेमके कुठे पाठवायचे, असा प्रश्न त्यांनाही पडतो. अप्पर सुपर डेपो परिसरात अनेक मैदाने खासगी वाहनांच्या पार्किंगने वेढली आहेत. दुर्गामाता उद्यान तर तळीरामांचा अड्डा झाला आहे. मैदानात काचांचा खच आहे, गवत नाही. मैदानाच्या उद्यानाच्या कडेने संरक्षक भिंत नाही. त्यामुळे स्थानिकांचा कचरा या मैदानात मोठ्या प्रमाणात पडलेला दिसतो. महापालिकेचे सुरक्षा कर्मचारी असूनही ते मूग गिळून गप्प बसतात. दुर्गामाता मंदिर परिसर, सुपर संस्कृती भवन, तसेच सुवर्णविद मित्रमंडळाच्या पाठीमागील उद्यान व विश्वकर्मा विद्यालयातील लोखंडी पूल इत्यादी भागात पोलिसांची किमान चार वेळा तरी गस्त असणे अपेक्षित आहे.
अप्पर-सुपर येथील दुर्गामाता उद्यानाची दुरवस्था झालेली आहे. याबाबत तातडीने निविदा काढून दुरुस्ती केली जाईल. तसेच, बिबवेवाडी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्या परिसरात तळीरामांना बसण्यास मज्जाव केला जाईल.
– अशोक घोरपडे. उद्यान अधीक्षक, महापालिका.
हेही वाचा