पिंपरी : पोस्टात आता डिजिटल व्यवहार

पिंपरी : पोस्टात आता डिजिटल व्यवहार
Published on
Updated on

नंदकुमार सातुर्डेकर
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या आवाहनास पोस्टाने प्रतिसाद दिला आहे. पोस्टात आता 'युपीआय क्यूआर कोड'द्वारे रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. इतरांची महत्वाची कागदपत्रे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे विश्वासार्ह माध्यम म्हणून पोस्टाची खरी ओळख होय. आता त्या ओळख तशीच राहून किंबहुना वाढवून त्याला अधिक गुप्ततेची झळाळी देण्याचे काम पोस्ट खात्याकडून होत आहे. पिंपरी चिंचवडमधील 33 पोस्ट कार्यालयामध्ये 'क्यूआर कोड'द्वारे रक्कम स्वीकारण्यात येत आहे. तूर्त 10 ते 15 टक्के व्यवहार या पद्धतीने होत आहेत. भविष्यात हे प्रमाण वाढेल व कॅशलेसचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल, अशी पोस्ट खात्याला आशा आहे.

टपाल खात्याचे डाक सेवा हीच जनसेवा हे बोधवाक्य आहे. दीडशे वर्षांहून अधिक काळ जगातील सर्वात मोठे टपाल सेवेचे नेटवर्क म्हणून भारतीय टपाल कार्यालयाची ओळख आहे. बदलत्या काळानुसार स्पीड पोस्ट, बिजनेस पार्सल, मनी ट्रान्सफर या सुविधा अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत टपाल कार्यालयाने सुरू केल्या आहेत. पोस्टाने बँक सेवाही सुरू केली आहे. त्यामार्फत चेक एटीएमने व्यवहार करता येतात आता 'क्यूआर कोड' स्कॅन करून सेवा शुल्क जमा करण्याची नवी सुविधा टपाल खात्याने सुरू केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाचशे, हजार रुपयांच्या नोटा बंद केल्या डिजिटल व कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. देशातील राष्ट्रीयीकृत व खासगी तसेच सहकारी बँका व वित्त संस्थांनी त्यांच्या या प्रयत्नाला साजेसे धोरण स्वीकारले टपाल विभाग याबाबत काहीसा मागासलेला होता. मात्र, आता पोस्ट विभागाने कात टाकली आहे. टपाल विभागाने आता 'युपीआय क्यूआर कोड' प्रणाली अंगीकारली आहे. 'क्यूआर कोड' स्कॅन करून स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, मनीऑर्डर, पार्सल बुकिंग यासाठी लागणारे सेवाशुल्क ग्राहकांना भरता येऊ लागले आहे.

या उपक्रमामुळे टपाल कार्यालयात गेल्यानंतर कर्मचार्‍यांकडून सुट्टे पैसे देण्याचा होणारा आग्रह त्यातून होणारे वाद हे सारे आता इतिहासात जमा होणार आहे. त्याबरोबरच छोट्या-छोट्या व्यवहारांसाठी गुगल पे फोन पे करण्याची सवय लागलेल्या ग्राहकांना आता तशाच पद्धतीने क्यू आर कोड स्कॅन करून व्यवहार करणे शक्य होणार आहे. पोस्ट कार्यालयात गेल्यानंतर मला यूपीआयद्वारे व्यवहार करायचा आहे. म्हणजेच क्यू आर कोड स्कॅन करून पेमेंट करायचे आहे, असे काउंटरवर ऑपरेटरला सांगावे लागते. मग गुगल पे, फोन पे अशा पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता.

क्यू आर कोड स्कॅन करून सेवा शुल्क जमा करण्याची नवी सुविधा टपाल खात्याने सुरू केली आहे. पिंपरी चिंचवडमधील 32 पोस्ट कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद लाभत आहे.
                                                                -के. एस. पारखी,
                                                  जनसंपर्क अधिकारी, टपाल विभाग

पिंपरी पोस्ट ऑफिसमध्ये दररोज साधारण 100 ते 150 व्यवहार होतात. त्यातील 10 ते 15 टक्के व्यवहार 'युपीआय क्यूआर कोड' स्कॅन करून होत आहेत. रजिस्टर्ड, पार्सल, स्पीड पोस्टचे पेमेंट यूपीआयद्वारे स्वीकारले जाते.
                                                                     -ए. पी. निमसूडकर,
                                                              पोस्ट मास्तर, पिंपरी पोस्ट

हल्ली छोट्या छोट्या व्यवहारासाठी गुगल पे, फोन पे करायची सवय लागली आहे. त्यामुळे पोस्ट खात्याने क्यू आर कोड करून पेमेंट करण्याची ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली सुविधा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे सुट्ट्या पैशांची कटकट नाही की जवळ पैसे ठेवायची गरज नाही.
                                                             -मोनाली गावंडे, प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news