

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पावसाळा संपल्याने महापालिकेच्या पथ विभागाने कात्रज-कोंढवा रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम सुरू करताच या रस्त्यावर विविध कारणांसाठी खोदाईस सुरुवात केल्याने डांबरीकरणाचे काम पुन्हा थांबले आहे.
महापालिकेकडून 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी हा 4 किलोमीटरचा रस्ता 84 मीटर रुंद करण्याचे काम सुरू केले होते. प्रत्यक्षात 20 टक्के जागा ताब्यात असतानाच हे काम सुरू करण्यात आले. मात्र, नंतर भूसंपादन होऊ न शकल्याने हे काम अद्यापही बंदच आहे.
त्यामुळे महापालिकेने भूसंपादनासाठी येणारा खर्च आणि रस्त्याच्या कामाचा खर्च लक्षात घेऊन हा रस्ता तात्पुरता 50 मीटर करण्याचे निश्चित करण्यात आले. लगेच त्याचे कँाक्रीटीकरण शक्य नसल्याने पावसाळ्यापूर्वी त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी 5 कोटींच्या निविदेस मान्यता देण्यात आली. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने रस्त्यांवर होणार्या वाहतूक कोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.
पावसाळा संपताच पथ विभागाने रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू करताच या रस्त्यावर समान पाणी योजना, पालिकेचा विद्युत विभाग, ड्रेनेज विभाग आणि त्यात भरीस भर म्हणून एमएनजीएल गॅस कंपनीकडून खोदाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, पथविभागास हे काम थांबविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, आता या सर्व विभागांची खोदाई पूर्ण होईपर्यंत हे काम थांबविण्यात येणार असल्याने नागरिकांना पुन्हा जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे.
या रस्त्याचे काम पाऊस थांबताच सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम सुरू असतानाच काही भागांत पाणीपुरवठा, विद्युत, एमएनजीएल, ड्रेनेजची खोदाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, नव्याने रस्ता केल्यास तो पुन्हा खोदला जाण्याची शक्यता असल्याने हे काम तूर्तास थांबविले आहे. तसेच या विभागांना तातडीने काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
– व्ही. जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख