एका वर्षात 7500 रुग्णांचे डायलिसिस; महापालिकेच्या सेंटरमध्ये अल्पदरात सुविधा

एका वर्षात 7500 रुग्णांचे डायलिसिस; महापालिकेच्या सेंटरमध्ये अल्पदरात सुविधा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी रुग्णालयांमध्ये एका डायलिसिसचा खर्च दोन ते तीन हजार रुपये असतो. गरीब रुग्णांना हा खर्च परवडत नसल्याने महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमुळे काहीसा दिलासा मिळत आहे. महापालिकेच्या 7 डायलिसिस सेंटरमध्ये 57 मशिन कार्यरत असून, एका वर्षात साडेसात हजार रुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. भारतामध्ये साधारणपणे दर वर्षी एक लाख रुग्णांना किडनीचे विकार उद्भवतात. मधुमेह आणि हृदयरोगाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत असून, त्यामुळे किडनीचे आजारही वाढत आहेत. मूत्रपिंड अकार्यक्षम झाल्यास डायलिसिसशिवाय पर्याय उरत नाही.

रुग्णांना आवश्यकतेनुसार आठवड्यातून किमान एकदा डायलिसिसची आवश्यकता भासते. त्यामुळे महापालिकेने चालवलेल्या सेंटरमध्ये रुग्णांना कमी दरामध्ये सुविधा मिळत आहे. महापालिकेने पीपीपी तत्त्वावर सुरू केलेल्या सेंटरमध्ये डायलिसिससाठी केवळ 400 रुपये इतका खर्च येत असल्याची माहिती सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. कमी दराने उपचार मिळत असल्याने रुग्णांच्या खर्चामध्ये 84 टक्के बचत झाल्याचेही त्यांनी सांगितले.

महापालिकेच्या डायलिसिस सेंटरमध्ये सध्या 57 मशिन कार्यरत आहेत. पीपीपी तत्त्वावरील डायलिसिस प्रकल्पामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना महागडे उपचार अत्यल्प दरामध्ये उपलब्ध होऊ शकत आहेत. या प्रकल्पांतर्गत आत्तापर्यंत 64,387 रुग्णांनी डायलिसिसचा लाभ घेतला आहे.

– डॉ. भगवान पवार, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news