पुणे : धुळवडीला मटण, मासळी, चिकनवर ताव; मागणीत झाली वाढ

पुणे : धुळवडीला मटण, मासळी, चिकनवर ताव; मागणीत झाली वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : होळीच्या दुसर्‍या दिवशी धुळवडीला चिकन, मटणाबरोबरच मासळीलाही चांगली मागणी होती. मासळी बाजारातही ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. गणेश पेठेतील मासळी बाजारात सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मटण, चिकन व मासळीवर ताव मारून धुळवड साजरी केली गेली. कसबा पेठ, लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट तसेच विश्रांतवाडी, पौड फाटा, पद्मावती परिसरातील मासळी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. धुळवडीला मटण, मासळी, चिकनच्या मागणीत वाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

धुळवडीनिमित्त हॉटेल व्यावसायिक आणि घरगुती ग्राहकांकडून चिकनला मागणी होती. चिकनचे दर स्थिर असल्याची माहिती पुणे शहर बॉयलर असोसिएशनचे संचालक रूपेश परदेशी यांनी दिली. मासळीची आवक मागणीच्या तुलनेत कमी होत असल्याने दर तेजीत आहेत. होळीसाठी मच्छीमार किनारी परतले आहेत, त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस मासेमारी कमी होणार असून, आवक कमी होईल, असे गणेश पेठ मासळी बाजारातील व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले. धुळवडीनिमित्त मटणाला मागणी होती. हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती ग्राहकांंकडून चांगली मागणी होती, असे पुणे शहर मटण दुकानदार संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांनी सांगितले.

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर
मटण- 700 रुपये
चिकन- 200 ते 230 रुपये
पापलेट- 900 ते 1000 रुपये
बांगडा- 140 ते 160 रुपये
सुरमई- 600 ते 700 रुपये
कोळंबी- 180 ते 550 रुपये

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news