धायरीत पोलिस चौकी कधी? : परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त

धायरीत पोलिस चौकी कधी? : परिसरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक त्रस्त

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाचसहा वर्षांपासून सिंहगड रस्त्यालगतच्या धायरी परिसरात खून, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. असे असताना धायरीत स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. धायरीत पोलिस चौकी करण्याची मागणी धायरीकर अनेक महिन्यांपासून करत आहेत. मंगळवारी धायरीत एका युवकाचा खून करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे.

धायरी गाव व परिसराचा चोहोबाजूंनी विस्तार झाला आहे. महामार्ग तसेच सिंहगड रस्ता जवळ असल्याने दाट लोकवस्त्या, सोसायट्यांचे मोठे जाळे पसरले आहे. शिक्षणसंस्था, कंपन्या, गोदामेही वाढली आहेत. अडीच लाखांहून अधिक लोकसंख्या या परिसरात आहे.
वाढत्या लोकसंख्येबरोबर घरफोड्या, प्राणघातक हल्ले, चोर्‍या, दरोडे, खून अशी गुन्हेगारी वाढली आहे. सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुकमधील अभिरुची चौकी ही धायरीच्या शेवटच्या टोकापासून सहा ते सात किलोमीटर दूर अंतरावर आहे.

धायरीच्या आडबाजूच्या वस्त्यांत गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. गुन्हेगारांवर जरब निर्माण व्हावी, तसेच नागरिकांना तातडीने मदत मिळावी, यासाठी रायकर मळा, जाधवनगर भागात स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी आहे. याबाबत आम आदमी पार्टीचे पुणे शहर प्रवक्ते धनंजय बेनकर यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांना वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र, त्याकडे पोलिस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
धनंजय बेनकर म्हणाले, रायकर मळा, जाधवनगर भागात पोलिस चौकी झाल्यास गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहील. वडगाव बुद्रुकमधील पोलिस चौकी गैरसोयीची आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने वाढत्या लोकसंख्येमुळे धायरीत स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

परिसरात अनेक गुन्हेगार वास्तव्यास

धायरीतील जाधवनगर तसेच रायकर मळा भागात आतापर्यंत अनेक गुन्हे घडले आहेत. येथे स्वस्तात भाड्याने तसेच विकत फ्लॅट मिळत असल्याने इतर हद्दीतील अनेक गुन्हेगार या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. त्यामुळे या भागात गुन्हेगारी वाढली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलिस चौकीची गरज आहे, असे येथील रहिवाशांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news