

संतोष वळसे पाटील
मंचर : जिल्ह्यात असणारे श्रीक्षेत्र भीमाशंकर या देवस्थानचे मंदिर हे खेड तालुक्यात येत असून, मंदिराचा पायर्यांचा भाग हा आंबेगाव तालुक्यात येत आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या प्रशासकीय अधिकार्यांच्या समन्वयाअभावी भाविकांची फरपट सुरू आहे, याकडे मात्र कोणीही लक्ष द्यायला तयार नसल्याने भाविकांमध्ये तीव— नाराजी पसरली आहे. आंबेगाव तालुक्यातून रस्ता चांगला असल्याने हजारो भाविक मंचर-घोडेगाव मार्गे भीमाशंकर येथे येत असतात. भीमाशंकर देवस्थानचे कामकाज सचिव म्हणून खेड तालुक्याचे तहसीलदार पाहतात, तर भीमाशंकर येथे देवदर्शनाला येणार्या भाविक व पर्यटकांची वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षितता ही घोडेगाव पोलिस ठाणे पाहते. त्यामुळे दोन तालुक्यांच्या हद्दीत आलेले मंदिर आणि परिसराचे प्रशासन, स्थानिक प्रतिनिधी विशेष लक्ष देताना पहावयास मिळत नाही. हे सर्व थांबविण्यासाठी
राज्य शासनाने भीमाशंकर देवस्थानवर राज्यात इतर देवस्थानप्रमाणे असलेल्या आयएएस अधिकार्याची नेमणूक करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकरचे कामकाज सुरू करावे. जेणेकरून येथील भीमाशंकर मंदिरात सुधारणा होऊन भाविकभक्त पर्यटकांची लूटमार थांबण्यासाठी मदत होईल आणि येथील अवैध धंदे बंद होतील. श्रावण महिन्यातील यात्रेचे योग्य नियोजन करून सर्व पर्यटकांना व भाविकभक्तांना सुलभपणे दर्शन घेता येईल, अशी आशा भक्तांनी व्यक्त केली आहे. भीमाशंकर देवस्थान येथे ठिकठिकाणी कचर्याचे ढीग, प्लास्टिकच्या बाटल्या, कागद, चिखल, दुर्गंधी, अस्वच्छता पहावयास मिळते तसेच मोकाट जनावरे मोठ्या प्रमाणात फिरत असतात. भाविक तसेच पर्यटकांसाठी येथे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह याची कुठलीही सुविधा नसल्याने भाविकभक्त नाराजी व्यक्त करतात.
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसरात अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी वन विभागासाठी केंद्र शासनाचे कायदे आणि नियम लागू आहेत. हा भाग इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित झाल्याने छोटी-मोठी विकासकामे करायची असतील तरी वन विभागाची तसेच केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे येथील अनेक विकासकामे होण्यासाठी विलंब होत आहे. दिवसेंदिवस भाविक आणि पर्यटकांचा ओघ वाढत आहे; मात्र त्यांना भीमाशंकर देवस्थानमार्फत फारशा सुविधा मिळत नसल्याने भाविक-पर्यटक संताप व्यक्त करत आहेत.