

पुणे : शहरात पादचार्यांकडील दागिने, मोबाईल हिसकावणार्या चोरट्यांनी धुडगूस घातला आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांमध्ये पादचार्यांकडील मोबाईल तसेच दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा आणि कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत एका महिलेने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला 26 जून रोजी रात्री आठच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर भागातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 80 हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरून पसार झाले. सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर तपास करत आहेत.
कोंढवा भागातील गोकुळनगर चौकात एका पादचारी तरुणाच्या हातातील 10 हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. 27 जून) रात्री घडली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मध्यरात्री एकच्या सुमारास गोकुळनगर चौकातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाईल संच हिसकावून नेला. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.
पीएमपीत प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील 60 हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. फिर्यादी महिलेची आई पुणे स्टेशन ते वारजे माळवाडी या मार्गावरील बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये गर्दी होती. प्रवासात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील 60 हजारांची बांगडी चोरली. सहायक पोलिस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.