

राहू: तेली समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेली समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, कोषाध्यक्ष गजानन शेलार, उपाध्यक्ष संजय विभुते, अध्यक्षा पुष्पाताई बोरसे, जगदीश वैद्य, प्रवीण बावनकुळे व इतर पदाधिकार्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी वरील आश्वासन दिले. (Latest Pune News)
देवळी-वर्धा येथे आयोजित तेली समाजाच्या राज्यव्यापी अधिवेशनासाठी तेली समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले. या अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्य केले आहे.
या वेळी झालेल्या मॅरेथॉन बैठकीत तेली समाजाच्या काही प्रलंबित समस्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये श्रीसंत संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळाने अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा. मध्य प्रदेशच्या धर्तीवर तेलघाणीच्या विकासासाठी तेलघाणी विकास महामंडळाची स्थापना करावी.
सिडकोला नवी मुंबईत लवकरात लवकर भूखंड मिळावा. श्रीक्षेत्र सुदुंबरेच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून द्यावा. तेली समुदायाच्या छोट्या व्यापार्यांवर अतिरिक्त तेलावर लादलेले जाचक निर्बंध तत्काळ उठवावेत. पुणे जिल्हास्तरावरील महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर विशेष बैठक घेण्यात यावी.
याशिवाय अनेक सामाजिक समस्या आणि मुद्द्यांवरही चर्चा झाली. या सर्व समस्या लवकरच सोडविण्याचे सकारात्मक आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले.
पुणे जिल्ह्यातील तैलिक महासभेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व संबंधित खात्याच्या सर्व अधिकार्यांसमवेत संयुक्त बैठक होणार असल्याची माहिती तैलिक महासभेचे दक्षिण पुणे जिल्हाध्यक्ष राहुल खळदे यांनी दिली.