

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मी राजकारणातील सुपरस्टार गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे. मला एखादे पद, प्रतिष्ठा नाही मिळाली तरी चालेल मात्र, त्यासाठी लोकांच्या विकासकामांना नख लावणार नाही. कट-कारस्थान करण्याची गरज नाही किंवा कोणाला पाण्यात पाहण्याची देखील गरज नाही, असे परखड मत भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी व्यक्त केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना व मित्र पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी मुंडे यांची रहाटणी येथे सभा झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी आमदार शिवाजीराव कवेकर, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 वर्षाचे असताना काय होते, हे ज्या तरुणांना समजेल त्यांच्या जीवनात परिवर्तन घडेल. पिंपरी-चिंचवडमध्ये मराठवाड्यातून बरेच नागरिक वास्तव्यास आले आहेत. शहरवासियांचा शास्ती कर माफ करण्याचा निर्णय झाला.
शहरातील बर्याच नागरिकांकडे प्रॉपर्टी कार्ड नाहीत. त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्याशिवाय आमची वचनपुर्ती होणार नाही.
माझ्याप्रमाणेच अश्विनी जगताप या देखील वाघीण
मला माझे वडील जिवंत असताना रणरागिनी म्हटले जायचे. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्यामध्ये असलेला बाणा, स्वाभिमान यामुळे मला वाघीण म्हटले जाऊ लागले. तशाच अश्विनी जगताप या देखील वाघीण आहेत. त्या विजयी होतील. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील प्रश्नांसाठी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये आले आणि राज्यात भाजप-शिवसेना युतीची सत्ता आली. युतीची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडचे सर्व प्रश्न सोडवण्यात आले, असे पंकजा मुंडे यांनी नमूद केले.