नारायणगाव: नारायणगाव येथील मच्छी मार्केट ते खैरे हॉस्पिटल यादरम्यानच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने वाहनचालकांना अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे. एक वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली खरी; परंतु अद्यापही काम पूर्ण होत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली जात आहे.
एवढे दिवस होऊनही रस्त्याचे काम पूर्ण होत नसेल, तर हे दुर्दैव आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कामाला सुरुवात करावी; अन्यथा या विभागाच्या जुन्नरच्या कार्यालयाला टाळे ठोकले जाईल, असा इशारा नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांनी दिला.(Latest Pune News)
उपसरपंच पाटे म्हणाले, या रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित व्यक्तींची एकत्रित बैठक अनेकवेळा झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भामध्ये योग्य दखल घेण्याची गरज आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हे काम अपूर्ण असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा रस्ता रुंद करून काँक्रिटीकरण करावे, यासाठी माजी आमदार अतुल बेनके यांनी विशेष बाब म्हणून शासनाकडून निधी उपलब्ध करून आणला आहे. रस्त्याचे निम्मे काम झाले आहे व निम्मे काम बाकी आहे. याबाबत पाटे यांनी नाराजी व्यक्त केली.
रस्त्याच्या कडेचे अतिक्रमण अद्यापही निघालेले नाही. त्यामुळे काम पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या कडेला ज्यांचे अतिक्रमण आहे, त्यांच्याशी अनेकदा चर्चा करूनही ते अतिक्रमण काढत नाही. त्यामुळे या रस्त्याचे काम एवढे दिवस रेंगाळले आहे. तथापि, रस्त्याच्या कडेच्या गटारीचे काम तातडीने पूर्ण करून उर्वरित रस्त्याचे काम लवकर मार्गी लावू.
- केशव जाधव, प्रमुख, सार्वजनिक बांधकाम विभाग, जुन्नर