बिबवेवाडी: स्वामी विवेकानंद रस्त्यावरील सांडपाणी वाहिनी आणि पावसाळी वाहिनीच्या कामासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. त्यामुळे आता ड्रेनेजचे चेंबर चोकअप होऊन सांडपाणी रस्त्यावरून वाहणे थांबेल अशी आशा होती.
मात्र नुकत्याच झालेल्या जोरदार अवकाळी पावसाचे पाणी पुन्हा रस्त्यावरून वाहात असल्याने ड्रेनेज अन् पावसाळी वाहिनीचा कोट्यवधी रुपये खर्च पाण्यात गेला काय असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे. (Latest Pune News)
पुणे महापालिकेच्या मुख्य खात्याच्या वतीने महेश सोसायटी चौक ते अप्पर डेपो दरम्यान कोट्यवधी रुपयांचा खर्च करून ड्रेनेज लाईन व पावसाळी वाहिनीचे काम करण्यात आले. मात्र रस्त्यावर पुन्हा पाण्याचे डोह साचायला लागल्याने प्रशासनाच्या या कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे. याबाबत महापालिका अधिकार्यांशी संपर्क साधला असता आपण मीटिंगमध्ये आहे असा निरोप पाठवून त्यांनी या प्रश्नाबाबत बोलण्याचे वा प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
इंदिरा नगर चौक ते जुना बस स्टॉप चैत्रबनपर्यंत महापालिकेकडून करण्यात आलेले ड्रेनेज लाइनचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे काम झाल्यानंतरही रस्त्यावरून नेहमीच दुर्गंधीयुक्त सांडपाणी आणि मैला पाणी वाहात आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याची कसलीही दखल घेतली जाताना दिसत नाही.अगदीच वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारी गेल्यानंतर ठेकदाराकडून तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते; मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती होते. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला नाही, तर नागरिकांकडून या पाण्याच्या बाटल्या अधिकार्यांना भेट दिल्या जातील.
- अमोल परदेशी, स्थानिक रहिवासी अप्पर.