पुणे : मुक्ताईच्या भेटीसाठी माऊलींच्या पादुकांचे रविवारी प्रस्थान

पुणे : मुक्ताईच्या भेटीसाठी माऊलींच्या पादुकांचे रविवारी प्रस्थान
Published on
Updated on

श्रीकांत बोरावके : 

योगी पावन मनाचा।
साहे अपराध जनाचा॥1॥
विश्व रागे झाले वन्ही।
संती सुखे व्हावे पाणी॥2॥
शब्द शस्त्रे झाले क्लेश।
संती मानावा उपदेश॥3॥
विश्वपट ब—ह्म दोरा।
ताटी उघडा ज्ञानेश्वरा॥4॥

आळंदी : जनकल्याणाचा उपदेश देत माऊलींना रागापासून परावृत्त करणार्‍या, पाठीवर मांडे भाजत भावाची भूक शमवणार्‍या मुक्ताई आणि माऊलींचे बंधू-भगिनी प्रेम सर्वश्रुत आहेच. हेच प्रेम अधिक वृद्धिंगत करत गेल्या पाच वर्षांपासून श्री ज्ञानमुक्ता उपदेश गाथा सेवाभावी न्यासच्या माध्यमातून पार पडत असलेला सोहळा यंदाही पार पडणार आहे. माऊलींची पालखी मुक्ताईच्या भेटीसाठी श्रीक्षेत्र मेहुण (तापी नदीतीर, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) च्या दिशेने मार्गस्थ होणार आहे.

माऊलींच्या समाधी मंदिरातून पादुकांचे पूजन होऊन माघ शुद्ध पौर्णिमा, रविवारी (दि. 5) सकाळी आठ वाजता माऊलींच्या पादुकांचे वारीसाठी प्रस्थान होणार आहे. महाद्वारातून पादुका रथात विराजमान होऊन आपल्या पहिल्या दिवसाच्या प्रवासासाठी मार्गस्थ होतील. सकाळी चाकण, खराबवाडी येथे विसावा घेत दुपारी वाकी भाम नदी येथे दुपारचा विसावा घेत पालखी पहिल्या मुक्कामासाठी चाळकवाडी येथे दाखल होईल अशी माहिती श्री संत ज्ञानेश्वर माऊली पायी दिंडी पालखी सोहळा माघ वद्य संत मुक्ताई मेहुणवारी सोहळ्याचे संस्थापक, व महाराष्ट्र राज्य भागवतधर्म परिषदेचे अध्यक्ष ह. भ. प. कृष्णा महाराज परेराव कुर्‍हेकर यांनी दिली आहे.

…असा असेल सोहळ्याचा दिनक्रम

सोमवारी (दि. 6) सकाळी पालखी सोहळा संगमनेरमार्गे धारणगावमध्ये दुपारचा विसावा, तसेच लासलगाव येथे कीर्तन व मुक्काम.

मंगळवारी (दि. 7) सकाळी दुपारचा विसावा, पाटोदा. नांदगाव येथे रात्रीचे कीर्तन व मुक्काम.

बुधवारी (दि. 8) चाळीसगावमध्ये दुपारचा विसावा, पाचोरा येथे कीर्तन व रात्रीचा मुक्काम.

गुरुवारी (दि. 9) दुपारी वरखेडी नगरीत विसावा, शेंदुर्णी नगरीत कीर्तन व रात्रीचा मुक्काम.

शुक्रवारी (दि. 10) त्रिविक्रम नगरीत दुपारचा विसावा, पहूर गावी कीर्तन व रात्रीचा मुक्काम. शनिवारी (दि. 11) पिंपळगाव गोलाई येथे दुपारचा विसावा व जामनेरमध्ये कीर्तन आणि रात्रीचा मुक्काम.

रविवारी (दि. 12) दुपारी गारखेडा नगरीत माऊली नैवेद्य वारकरी भोजन विसावा घेऊन श्री क्षेत्र कुर्‍हे पानाचे नगरीत कीर्तन व मुक्काम.

सोमवारी (दि. 13 ) चोरवडमध्ये दुपारचा विसावा घेत पालखी फेकरी येथे कीर्तन व मुक्काम करेल. शुक्रवारी द्वादशीला उपवास सोडून पालखी सोहळा परतीच्या गाडीने देवगडला मुक्कामी येतो. शिक्रापूरला दुपारी विसावा घेऊन संध्याकाळी आळंदी येथे माऊली मंदिरात पोहोचेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news