

Indian Institute of Tropical Meteorology Pune Winter Fog Experiment
पुणे: जगातील पहिले फॉग प्रेडिक्शन मॉडेल पुण्यातील आयआयटीएम (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल टेक्नोलॉजी) या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संस्थेतील हवामान शास्त्रज्ञांनी तयार केले आहे. हे मॉडेल ज्या प्रयोग शाळेतून चालणार आहे, त्याचे उद्घाटन केंद्रीय पृथ्वी विमान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन यांनी केले.
दाट धुक्यामुळे दर वर्षी देशभरात सुमारे 13 हजार नागरिकांचा मृत्यू होतो. त्यावर उपाय म्हणून हे मॉडेल विकसित करण्यात आले. यावर विकसित केलेल्या रासायनिक प्रयोगशाळेचे उद्घाटन मंगळवारी दुपारी झाले. त्या वेळी डॉ. रविचंद्रन यांनी सांगितले की, सन 2015 मध्ये दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे मॉडेल बसविण्यात आले. (Latest Pune News)
त्यावर सतत दहा वर्षे संशोधन केल्याने ते जगातील सर्वोकृष्ट अन् अत्याधुनिक झाले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील सर्वच विमानतळांवर ते बसवले जाईल, नंतर रेल्वे आणि इतर वाहतुकीसाठी ते सुचवले जाणार आहे. सामान्य नागरिकांना काही दिवसांत ते मोबाइलवर दिसेल.
15 ते 25 कोटी रुपये खर्च लागणार
विमानतळांसह देशातील स्थानिक पातळीवर जर हे मॉडेल बसवायचे असेल, तर किती खर्च येईल, या प्रश्नावर डॉ. रविचंद्रन म्हणाले की, सुमारे 15 ते 25 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मात्र, ही यंत्रणा टप्प्या टप्प्याने सुचवली आहे. यात प्रामुख्याने उत्तर भारतात बसवली जाईल.
कारण, त्या भागातच डिसेंबर ते जानेवारी या दोन महिन्यात दाट धुक्यामुळे विमाने रद्द होतात. रेल्वेसह इतर वाहनांचे मोठे अपघात होतात. वर्षाला देशात यामुळे सुमारे 13 हजार लोकांचे प्राण जातात. दिल्ली, इटानगर, गुवाहाटी, दिब्रुगड, दिसापूर,जोरहाट या ठिकाणी ही यंत्रणा पहिल्या टप्प्यात बसवली जाणार आहे.
मॉडेलची अचूकता 85 टक्के
हे मॉडेल ज्यांनी विकसित केले, ते डॉ. सचिन घुडे हे सफर नावाच्या आयआयटीएम संस्थेतील या हवा प्रदूषण विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या टीमने हा अभ्यास दहा वर्षे करून तयार केले. डॉ. घुडे म्हणाले, या मॉडेलची अचूकता 85 टक्के इतकी आहे. ते पुण्यात तयार झाले असून, त्यात हवेतील प्रदूषित अनेक घटकांचा अभ्यास करण्यात आला आहे. धुक्याचा अंदाज तीन दिवस आधी देता येईल. त्यामुळे विमानांचे उड्डाण, रेल्वेचे प्रस्थान थांबविणे शक्य होईल. तसेच, रस्त्यावर होणारे अपघात कमी होण्यास मदत होईल.