पुणे; पुढारी वृत्तसेवा: जोरदार पाऊस व वाहनांची मोठी वर्दळ यामुळे विविध कामांना विलंब होत असल्याने चांदणी चौकातील जुना पूल पाडण्याला आणखी आठवडा लागण्याची शक्यता आहे. तेथील सेवा वाहिन्या स्थलांतरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
पुणे महापालिकेकडून त्यांच्याकडील बहुतांशी सेवावाहिन्या काढण्यात आल्या आहेत.
मात्र, अन्य सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेलाच विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी विलंब होत आहे. पुलाच्या परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर नऊ ते दहा तास वाहतूक थांबविणे, पडलेला राडारोडा काढण्याची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे नियोजन महत्त्वाचे आहे. याशिवाय पूल पाडताना पाऊस नसणे आवश्यक आहे. अन्यथा पडणारा ओला राडारोडा उचलणे मोठे जिकिरीचे काम आहे.