

ओतूर: पोक्सोच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एका निवृत्त सहायक फौजदारास दोन कोटींची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथे घडला आहे. याप्रकरणी पती, पत्नी आणि विधिसंघर्षित मुलीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली.
खामुंडी (ता. जुन्नर) येथे निवृत्त सहायक फौजदार हे पत्नीसह राहण्यास आहेत. त्यांच्याशेजारी राहणार्या कुटुंबाशी त्यांची तंटामुक्ती समितीच्या कामातून ओळख झाली. त्यानंतर ती घनिष्ठ होत त्यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले. दरम्यान, या कुटुंबाची मुलगी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने तिचे अभिनंदन करण्यासाठी निवृत्त सहायक फौजदार हे या कुटुंबाच्या घरी गेले होते. या वेळी संबंधित मुलगी घरी एकटीच होती. (Latest Pune News)
दरम्यान, मुलीचे अभिनंदन करून निवृत्त सहायक फौजदार हे घरी गेल्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्यांना फोन करून ‘तुम्ही माझ्या मुलीसोबत चुकीचे वर्तन का केले? मी तुमच्यावर ‘पोक्सो’चा गुन्हा दाखल करणार आहे. गुन्हा दाखल होऊ द्यायचा नसेल तर आम्हाला दोन कोटी रुपये द्या, आम्ही गुन्हा दाखल करणार नाही’ अशी धमकी दिली.
या धमकीला घाबरत निवृत्त सहायक फौजदार यांनी 50 लाखांचे तीन धनादेश मुलीच्या वडिलांना दिले. त्यानंतर देखील 50 लाख रुपयांसाठी त्यांनी तगादा लावला असल्याने निवृत्त सहायक फौजदार यांनी याबाबत ओतूर ठाण्यात फिर्याद दाखल केली. ओतूर पोलिसांनी फिर्याद दाखल करून पती, पत्नी आणि त्यांची विधिसंघर्षित बालिका यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार महेश झनकर करत आहेत.