वडगाव मावळ : मावळ लोकसभा मतदासंघांची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) देण्यात यावी, असा ठराव मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वडगाव मावळ येथे झालेल्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. पक्षाचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस युवकचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, तालुका कार्याध्यक्ष साहेबराव कारके, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष सुरेश धोत्रे, सामाजिक न्याय सेलचे जिल्हाध्यक्ष विकी लोखंडे, सुकाणू समिती सदस्य तुकाराम असवले यांच्यासह सर्व विभाग अध्यक्ष, सर्व सेल अध्यक्ष व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला देण्यात यावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे सर्व सेल अॅक्टिव्ह मोड आहेत. सेलच्या बैठकांमधून अजित पवार यांची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी काय रणनीती अवलंबवावी यावर विशेष मार्गदर्शन या वेळी करण्यात आले. कार्याध्यक्ष साहेबराव कारके यांनी स्वागत केले, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष संदीप आंद्रे यांनी आभार मानले.
मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत नाना काटे यांनी मोठी टक्कर दिली होती. तर, मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची निर्विवाद ताकद आहे. घाटाखाली उरण, पनवेल आणि कर्जत विधानसभा मतदारसंघावर उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे यांचा विशेष प्रभाव आहे.
अजित पवार गटाने यापूर्वी गावभेट दौरा करीत नागरिकांशी सुसंवाद झाला आहे. येत्या आठवड्यात गावभेट दौर्याचा दुसरा टप्पा काढून नागरिकांशी संवाद साधण्याच्या सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना करण्यात आल्या आहेत. मावळची जागा मिळाली तर भरघोस मताधिक्याने विजय संपादन करू.
– गणेश खांडगे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी
हेही वाचा