Pimpri News : अद्यापही उपयोगकर्ता शुल्क कायम | पुढारी

Pimpri News : अद्यापही उपयोगकर्ता शुल्क कायम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कचरा संकलन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उपयोगकर्ता शुल्क वसूल केले जाते. हे शुल्क वसुलीस मागील अधिवेशनात स्थगिती देण्यात आली आहे. मात्र, महापालिकेच्या वतीने हे शुल्क अद्यापही वसूल केले जात आहे. आतापर्यंत 3 लाख 70 हजार 894 मालमत्ताधारकांनी एकूण 46 कोटी 67 लाखांच्या उपयोगकर्ता शुल्क भरला आहे. महापालिकेच्या वतीने घराघरांतून तसेच, दुकाने, कार्यालय, हॉटेल व इतर आस्थापनातून घंटागाडी व इतर वाहनांतून दररोज कचरा गोळा गेला जातो. या कामासाठी महापालिकेने 1 एप्रिल 2023 पासून उपयोगकर्ता शुल्क वसुली सुरू केली आहे.

शहरात सहा लाख 10 हजारपेक्षा अधिक निवासी, बिगरनिवासी व औद्योगिक घरटी दरमहा 60 रुपये व व्यावसायिक आस्थापना असलेल्या मालमत्तांना त्यांच्या मालमत्तेच्या आकारमानानुसार शुल्क आकारण्यात येत आहे. हे शुल्क 1 एप्रिल 2019 पासून वसूल केले जात आहे. एका वर्षाचे निवासी मिळकतीस 720 रुपये होतात. सध्याचे 2023-24 आणि सन 2019-20 चे असे दोन वर्षांचे एकत्रित 1 हजार 440 रुपये मिळकतकर बिलात समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे मिळकतकरासोबत हे शुल्क नागरिकांच्या माथी मारण्यात आले आहे. आतापर्यंत तब्बल 46 कोटी 67 लाखांचे उपयोगकर्ता शुल्क जमा झाले आहे.

स्वच्छता कर घेत असताना नव्याने उपयोगकर्ता शुल्क घेऊ नये. राज्यातील बहुतांश महापालिकांनी हा शुल्क लावलेला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेने हे शुल्क का लादले आहे, या प्रश्न उपस्थित करीत नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी या शुल्कास विरोध केला होता. मात्र, मोठ्या संख्येने मिळकतधारक हे शुल्क भरत असल्याचे चित्र आहे. नागरिकांचा विरोध लक्षात घेऊन भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी मुंबई झालेल्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर लक्षवेधी मांडली होती.

या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत संबंधित विभागाच्या अधिकार्यांची बैठक झाली. त्यानंतर नियम व अटींची पडताळणी करून याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत शुल्क वसुलीला स्थगिती देण्याची घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली होती. मात्र, अद्याप उपयोगकर्ता शुल्क वसुलीला स्थगितीचा आदेश महापालिकेला मिळालेला नाही. त्यामुळे महापालिकेकडून या शुल्काची वसुली सुरूच आहे.

अद्याप राज्य शासनाचा स्थगिती आदेश नाही

उपयोगकर्ता शुल्क वसुलीबाबत राज्य सरकारचा अद्याप स्थगिती आदेश आलेला नाही. त्यामुळे ती शुल्क वसुली कायम आहे. स्थगिती आदेश आल्यास ज्या मिळकतधारकांनी शुल्काची रक्कम भरली आहे, त्यांच्या रकमेचे समायोजन करण्यात येईल, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button