

गणेश खळदकर
पुणे : गगनाला भिडणार्या इंधन दरामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे कॉम्प्युटर सायन्स, आयटीनंतर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अर्थात 'ई अॅण्ड टीसी' शाखेला महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलेला अभ्यासक्रम आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातील संशोधनाच्या संधींमुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. यातूनच येत्या काळात 'ई अॅण्ड टीसी' शाखेला मागणी वाढणार आहे.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दुचाकी, चारचाकी प्रवासी, तसेच मालवाहतूक अशी सर्वच वाहने इलेक्ट्रिक घेण्याकडे लोकांचा कल आहे. त्याला राज्य, तसेच केंद्र सरकारदेखील विविध सुविधा देऊन सहकार्य करीत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगांमध्ये 'ई अॅण्ड टीसी'च्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमधील महत्त्वाचा घटक बॅटरी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना बॅटरीचा आकार कमी करणे, तिची चार्जिंग क्षमता वाढविणे, कमीत कमी कालावधीत बॅटरी चार्ज करणे, बॅटरीचे आयुष्य वाढविणे यामध्ये संशोधनात सर्वाधिक वाव आहे.
त्याचबरोबर ई अॅण्ड टीसी अभ्यासक्रमात एम्बेडेड सिस्टिम ही एक विशेषता आहे. यात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचा सुंदर मिलाफ दिसून येतो. ज्यावर बरीच स्वयंचलित यंत्रे आधारित आहेत. या यंत्रणा प्रोग्राम केलेल्या सिस्टिम असतात. ज्यात विशिष्ट कार्ये करण्यासाठी सॉफ्टवेअर सहसा हार्डवेअरमध्ये (चिप) एम्बेड केले जाते. त्याचबरोबर रोबोटीक्स हीदेखील ई अॅण्ड टीसीची एक महत्त्वाची शाखा आहे. हे क्षेत्र मानवी हालचालींची प्रतिकृती बनवू शकणार्या मशिन्सचे निर्माण, उपयोग आणि नियंत्रणाशी संबंधित आहे. यासह अन्य तंत्रज्ञानामुळे ई अॅण्ड टीसीच्या विद्यार्थ्यांना प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत.
सरकारी आणि खासगी क्षेत्रात नोकरीच्या संधी
खासगी क्षेत्र
इलेक्ट्रिक व्हेईकल कंपन्या
इंटेल कॉर्पोरेशन
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स
टेक्सास उपकरणे
फिलिप्स सेमीकंडक्टर
आंतरराष्ट्रीय व्यवसाय मशिन कॉर्पोरेशन (आयबीएम)
सिस्को सिस्टीम
एचसीएल टेक्नोलॉजीज
सरकारी क्षेत्र
ईसीआयएल (इलेक्ट्रॉनिक्स
कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड)
बीएआरसी (भाभा अणू संशोधन केंद्र)
डीआरडीओ (संरक्षण संशोधन
आणि विकास संस्था)
बीईएल (भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड)
डीईआरएल (डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स
आणि संशोधन प्रयोगशाळा)
भेल (भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड)
एचएएल (हिंदुस्तान एयरोनॉटिक्स
लिमिटेड) रेल्वे विभाग