
शेळगाव; पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील शेतकर्यांना मागील काही वर्षांत शेतीव्यवसायात अनेक अडचणी आल्या. अनेक नैसर्गिक, आर्थिक संकटे आली असतानादेखील त्या अडचणीवर मात करत शेतकरी शेतीव्यवसाय उत्तम करत आहेत. या बळिराजाच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्यासमोर मांडून त्या मार्गी लावण्याची ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शेतकर्यांना दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथे शुक्रवारी (दि 23) शेतकर्यांशी संवाद साधताना सीतारामन बोलत होत्या. या वेळी निरा भिमाचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल जाधव, कृषीनिष्ठ शेतकरी मोहन दुधाळ, कर्मयोगीचे संचालक आबासाहेब शिंगाडे, राहुल जाधव, भागवत भुजबळ यांच्या हस्ते सीतारामन यांचा सत्कार करण्यात आला.
सीतारामन पुढे म्हणाल्या, 'शेतकर्यांना कोल्ड स्टोरेज तसेच शेतीपूरक व्यवसायासाठी नाबार्ड बँक तसेच केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करून जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार आहे.
किसान क्रिडेट कार्डच्या माध्यमातून शेतकर्यांना पशु-मस्त्य पालन व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करण्यात येईल. पीकविमाच्या संदर्भात केंद्रीय कृषिमंत्री, विमा कंपनीशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.'या वेळी शेतकरी विठ्ठल नारायण ननवरे, भारत बबन शिंगाडे व मनोज फक्कड जाधव यांनी सीतारामन यांच्याशी संवाद साधला. या वेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर तालुक्यातील गारपिटीनंतर शेतकर्यांवर अनेक संकटे आली. दोन वर्षात कोरोनामुळे शेतीव्यवसाय अडचणीत सापडला, त्यामुळे राष्ट्रीयीकृत सह अन्य बँकाचे कर्ज थकलेले आहे, यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. यामुळे कर्जाबाबत तसेच उद्योग धंदे करण्यासाठी शेतकर्यांना केंद्राकडून सवलत देण्यात यावी.
या वेळी बारामती लोकसभा प्रभारी आमदार राम शिंदे, आमदार राहुल कुल, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पृथ्वीराज जाचक, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, माजी जिल्हा परिषद सदस्या भारती मोहन दुधाळ, डॉ. सोनाली ननवरे, तानाजी थोरात, वसंत मोहोळकर, रोहित मोहोळकर, माऊली चवरे, युवराज म्हस्के सह मोठ्या संख्येने शेतकरी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक बाबासाहेब चवरे यांनी केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर, तर आभार कर्मयोगीचे संचालक आबासाहेब शिंगाडे यांनी मानले.